मेयोचा इन्टर्न डॉक्टरचा मृत्यू, चौकशी समीती स्थापन
By सुमेध वाघमार | Published: July 27, 2024 05:01 PM2024-07-27T17:01:11+5:302024-07-27T17:06:36+5:30
उपचार न करताच मेडिकलला पाठविले : न्युरो सर्जन कधी मिळणार?
सुमेध वाघमारे
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेयो) इन्टर्न डॉक्टराचा मृत्यूने शनिवारी खळबळ उडाली. कामठी रोडवर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या इन्टर्न डॉक्टरला मेयोमध्ये दाखल केल्यावर तेथील डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार न करता मेडिकलला पाठविल्याची माहिती आहे. वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याने संतप्त इन्टर्न डॉक्टरांनी अधिष्ठात्यांना घेराव घातला. अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांनी या घटनेला गंभीरतेने घेत चौकशी समीती स्थापन केली. यात दोषी आढळून येणाऱ्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल, असेही त्यांनी ‘लोकमतला’ सांगितले.
फैज मोहम्मद खान (२२) रा. कामठी रोड असे मृत इन्टर्न डॉक्टरचे नाव आहे. मेयोमधून एमबीबीएस केल्यावर त्याची इन्टर्नशीप सुरू होती. शेवटचा एक महिना उरला होता. प्राप्त माहितीनुसार, शनिवारी सकाळी त्याचा कामठी रोडवर अपघात झाला. त्याला तातडीने मेयोच्या आकस्मिक विभागात दाखल केले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. सर्जरी विभागाच्या निवासी डॉक्टरांनी त्याला तपासले. मेयोमध्ये न्युरो सर्जन नसल्याने डॉक्टरांनी मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये रेफर केले. मेडिकलच्या डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषीत केले. फैजवर मेयो येथेच उपचार न करता मेडिकलला का पाठविले, यावर इन्टर्न डॉक्टरांनी अधिष्ठाता डॉ. चव्हाण यांना जाब विचारला. डॉ. चव्हाण यांनी त्यापूर्वीच या प्रकरणाला गंभीरतेने घेत चौकशी स्थापन करून तातडीने अहवाल देण्याचे आदेश काढले.
रोज पडते न्युरो सर्जनी गरज
मेयोमध्ये रोज अपघाताचे रुग्ण येत असतात. काही रुग्णांना तातडीने न्युरो सर्जनची गरज पडते. परंतु हे पदच नसल्याने रुग्णांना मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये पाठवावे लागते. यात वेळ जात असल्याने रुग्णांचा जीव धोक्यात येतो. शनिवारी इन्टर्न डॉक्टरच्या मृत्यूने पुन्हा एकदा मेयोला न्युरो सर्जनची गरज पुढे आली. डॉ. चव्हाण यांनी न्यूरो सर्जन पदाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविणार असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.