एम्समध्ये यंदापासून वैद्यकीय अभ्यासक्रम

By admin | Published: July 4, 2016 02:28 AM2016-07-04T02:28:09+5:302016-07-04T02:28:09+5:30

मिहान येथील जमिनीवर एम्सचा परिसर तयार होण्यास लागणारा मोठा कालावधी लक्षात घेऊन तातडीने उपलब्ध इमारतीत एम्सचा ...

Medical courses this year from AIIMS | एम्समध्ये यंदापासून वैद्यकीय अभ्यासक्रम

एम्समध्ये यंदापासून वैद्यकीय अभ्यासक्रम

Next

मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा : मिहानमध्ये १५० एकर जागा
नागपूर : मिहान येथील जमिनीवर एम्सचा परिसर तयार होण्यास लागणारा मोठा कालावधी लक्षात घेऊन तातडीने उपलब्ध इमारतीत एम्सचा पहिल्या वर्षातील काही विषयाचे अभ्यासक्रम सुरू करण्याच्या दिशेने प्रयत्न करावेत, यासाठी राज्य शासन पुढाकार घेईल. वैद्यकीय अभ्यासक्रमातील काही विषयाचे वर्ग सुरू होण्यासाठी जिल्हधिकाऱ्यांनी विविध विभागाशी समन्वय साधून तातडीने अहवाल सादर करावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपुरातील हैदराबाद हाऊस येथील मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या बैठकीत केली.
यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे महापौर प्रवीण दटके, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर व केंद्रीय आरोग्य विभागाचे वरिष्ठ सचिव प्रामुख्याने उपस्थित होते.
मिहानमध्ये नाममात्र दरावर १५० एकर जागा एम्सला देण्यात आली आहे. एम्सची उभारणी करताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्किटेक्ट नेमून विकास योजना आराखडा तातडीने तयार करावा. जेणेकरून १६०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प देशात वैशिष्ट्यपूर्ण ठरावा यासाठी प्रयत्न करावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीस, आ. प्रा. अनिल सोले, आ. सुधाकर देशमुख, आ. सुधाकर कोहळे, आ. समीर मेघे, आ. नागो गाणार, आ. डॉ. मिलिंद माने, आ. विकास कुंभारे, अतिरिक्त मुख्यसचिव डॉ. पी.एस.मीना, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, संचालक शिनगारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)

विधी विद्यापीठासाठी चार कोटी रुपयांचा निधी
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासंदर्भात रविवारी बैठक झाली. विधी विद्यापीठाला देशातील सर्वोत्तम विधी संस्था म्हणून विकसित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, विविध सुविधांसाठी चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विधी विद्यापीठाला कालडोंगरी येथे ६० एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यापीठाच्या परिसरातील संपूर्ण बांधकामाचा सुमारे ५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. विद्यापीठासाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली असून, ‘जोती’ (ज्युडिशियल आॅफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी) येथे संस्था १ आॅगस्टपासून वर्ग सुरू होणार आहेत. तसेच भारतीय सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांची वसतिगृह व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी आवश्यक असलेल्या पदाची निर्मिती करण्याच्या दृष्टीने शिक्षक व शिक्षकेतर पदांना मान्यता देण्यात आली आहे. या बैठकीला माजी न्यायमूर्ती आर.सी. चव्हाण, कुलसचिव डॉ. एन.एम. साखरकर आदी उपस्थित होते.

अडचण सांगा, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी बोलू : गडकरी
एम्स उभारणीत काही अडचण येत असल्यास त्याचा तपशील मला द्यावा. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी चर्चा करून सर्व प्रश्न निकाली काढण्यात येतील. परंतू यावर्षी एम्सचा पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम सुरू करता येणे शक्य आहे काय, यासंदर्भात वेगाने पाऊल उचलावेत, असे आवाहन रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केले.

Web Title: Medical courses this year from AIIMS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.