मेडिकलची बिघडलेली ‘घडी’ रुळावर येणार!

By Admin | Published: July 17, 2016 01:47 AM2016-07-17T01:47:45+5:302016-07-17T01:47:45+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (मेडिकल) बिघडलेली घडी रुळावर आणण्यात अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे ...

Medical disaster will come on track! | मेडिकलची बिघडलेली ‘घडी’ रुळावर येणार!

मेडिकलची बिघडलेली ‘घडी’ रुळावर येणार!

googlenewsNext

टॉवर आॅफ होप’ घड्याळाची टीकटीक सुरू होणार : प्रशासनाचा निर्णय
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (मेडिकल) बिघडलेली घडी रुळावर आणण्यात अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांना यश येत असल्याचे दिसून येत असताना ते आता मेडिकलची जुनी ओळखही परत आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. ६४ वर्षे जुनी व गेल्या कित्येक वर्षांपासून बंद पडलेल्या मेडिकलच्या घड्याळाची टीकटीक पुन्हा सुरू करण्यास त्यांनी पुढाकार घेतला आहे. येत्या एक-दोन महिन्यात ही घड्याळ पुन्हा नव्या स्वरूपात सुरू होणार आहे.
एकेकाळी ‘टॉवर आॅफ होप’ म्हणून संपूर्ण देशात ओळखली जाणारी मेडिकलची ही घड्याळ १९५२ मध्ये सुरू झाली. इलेक्ट्रीक वर्क्स शनिवार पेठ पुणे यांच्याद्वारे ती बसविण्यात आली होती. चार ‘डायल’ असलेले हे घड्याळ एका मशीनद्वारे इलेक्ट्रिकच्या साहाय्याने कार्य करीत होते. प्रत्येक घड्याळाचा व्यास ८ फूट व वजन अंदाजे ९० किलोग्रॅम होते. मध्य भारतातील सुमारे ६० फूट उंचीवरील हे एकमेव टॉवर घड्याळ होते. त्या काळी रुग्णाच्या सेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या मेडिकलची ही घड्याळ ‘टॉवर आॅफ होप’ म्हणूनही ओळखले जायचे. त्यावेळी मॉडेल मिलच्या भोंग्यावर आणि या घड्याळाच्या काट्यावर अर्ध्या नागपूरचे कामकाज चालायचे. काळ बदलत गेला घराघरांत घड्याळी पोहचल्या. मनगटावरील घड्याळी स्टेटस सिम्बॉल बनल्या. परिसरात उंच इमारती उभ्या राहू लागल्या. खासगी रुग्णालयांचा व्याप वाढला तशी मेडिकलची विश्वासार्हताही ढासळू लागली. यामुळे की काय, घड्याळही चुकीची वेळ दर्शवू लागले. नंतर ती सुमारे १५-२० वर्षे बंदच होती. २००७ मध्ये मेडिकलच्या हीरक महोत्सवानिमित्त हे घड्याळ पूर्ववत सुरू करण्याचा प्रयत्न केला. टायटन कंपनीच्या सहकार्याने जुने घड्याळ काढून त्या ठिकाणी नवीन घड्याळ बसविण्यात आले. तत्कालीन नेत्रशल्य चिकित्सक डॉ. सतीश सुळे यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती. परंतु काही दिवस हे घड्याळ सुरू राहिले नंतर बंद पडले ते कायमचेच.
आता हे घड्याळ पुन्हा सुरू करण्यासाठी डॉ. निसवाडे यांनी प्रयत्न चालविला आहे. त्यांनी एका अधिकाऱ्याकडे ही जबाबदारी दिली. एका तज्ज्ञ व्यक्तीने नुकतीच घड्याळाची पाहणी केल्याचे समजते. त्याचे बिघडलेले पार्ट इंग्लंडमधून आणण्यासाठी प्रयत्न होणार आहे. यात जर अपयश आले तर घड्याळाचे ‘मेकॅनिझम’ बदलविण्यात येणार आहे. यामुळे येत्या एक-दोन महिन्यात ही घड्याळ सुरू होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Medical disaster will come on track!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.