मेडिकलच्या डॉक्टरांना कमिशनचा मोह
By admin | Published: October 3, 2015 02:40 AM2015-10-03T02:40:14+5:302015-10-03T02:40:14+5:30
हल्ली सगळ्याच क्षेत्रांत कमिशन घेणे हे सामान्य समजले जाते.
विशिष्ट पॅथालॉजीमधूनच चाचणी करण्याची घालतात गळ : २५ ते ५० टक्के मिळते कमिशन
लोकमत विशेष
सुमेध वाघमारे नागपूर
हल्ली सगळ्याच क्षेत्रांत कमिशन घेणे हे सामान्य समजले जाते. दुर्दैवाने मागील काही काळापासून वैद्यकीय क्षेत्राचाही त्यात समावेश झाला आहे. गरिबांचे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) काही डॉक्टरही या कमिशनच्या मोहात अडकले आहेत. गरीब रुग्णांना विशिष्ट खाजगी पॅथालॉजी लॅबमधूनच चाचणी करण्याची गळ घालून २५ ते ५० टक्के कमिशन लाटत असल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून बिनबोभाट सुरू आहे.
वैद्यकीय शास्त्रात उपचाराची पहिली पायरी म्हणजे त्या रुग्णाच्या आजाराचे प्रथमत: निदान होणे. त्यामुळेच रुग्णालयांतील पॅथालॉजी लॅब महत्त्वाची ठरते. मेडिकलमध्ये पॅथालॉजी, मायक्रोबॉयोलॉजी व बायोकेमेस्ट्री या स्वतंत्र लॅब आहेत. या तीनही लॅब मिळून ६० वर डॉक्टर, तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. शासनाचा यवर कोट्यावधी रुपयांचा खर्च होतो. नुकतेच बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांच्या सोयीसाठी ‘सेंट्रल पॅथालॉजी लॅब’ (क्लिनिकल पॅथालॉजी ओपीडी) सुरू करण्यात आली. सकाळी ९ ते दुपारी २ वाजतापर्यंत सुरू राहणाऱ्या या लॅबमध्ये तीनही विषयाच्या नमुन्यांची एकाच ठिकाणी चाचणी होते, तर दुपारी २ वाजतानंतर नमुने ‘इमरजन्सी लॅब’मध्ये पाठविले जातात. ही लॅब २४ ही तास सुरू असते. असे असतानाही कमिशनचा हव्यासापोटी गरीब रुग्णांना रक्त, मलमूत्र व इतर तपासण्यांसाठी मेडिकल चौकातील एका विशिष्ट खासगी पॅथालॉजीत पाठविले जाते. विशेष म्हणजे, या पॅथालॉजीचा मालक मेडिकलच्या भरवशावर गब्बर बनला आहे.
असे मिळते कमिशन
मेडिकलच्या डॉक्टरांना कमिशनचा मोह
नागपूर : जे डॉक्टर रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून चाचण्या करण्यास सांगतात त्या कागदावर विशिष्ट प्रकारची स्वाक्षरी ते करतात. या विशिष्ट स्वाक्षऱ्यांच्या चिठ्ठ्यांवरून संबंधित डॉक्टरांपर्यंत कमिशन पोहचविले जाते. दिवसभरात शंभरवर तरी चाचण्या या लॅबमध्ये पाठविल्या जात असल्याची माहिती आहे. यातून एका डॉक्टरला २५ ते ५० टक्के एवढे कमिशन मिळते. (प्रतिनिधी)
मेडिकलच्या रिपोर्टवर विश्वासच नाही म्हणून...
या संदर्भात मेडिकलच्याच एका डॉक्टराला विचारणा केली असता त्यांनी नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले की, मेडिकलच्या पॅथालॉजी लॅबचे रिपोर्ट अनेकवळा चुकीचे असतात. या रिपोर्टवरून आजाराचे निदान करून औषधोपचार केल्यास रुग्ण जीवानिशी जाण्याचा धोका असतो. याशिवाय रिपोर्ट यायला बराच वेळही लागतो. अनेक चाचण्या आपल्याकडे होत नाही. सुटीच्या दिवशी तर रिपोर्ट थेट दुसऱ्याच दिवशी मिळतो. यामुळे रुग्णांचे हित लक्षात घेऊनच काही डॉक्टर बाहेरून चाचण्या करण्यास सांगतात, परंतु अमूक पॅथालॉजीमधून करण्याचा सल्ला देत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
मेडिकलमध्ये होत असलेल्या चाचण्यांसाठीही खासगीचा रस्ता
प्रस्तुत प्रतिनिधीने संबंधित खासगी पॅथालॉजी लॅबमधून चाचण्यांचा अहवाल घेऊन आलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकाला याबाबत विचारले असता, त्याने अपघात विभागाच्या एका डॉक्टरने याच लॅबमधून चाचण्या करण्याची माहिती दिली. विशेष म्हणजे, त्याने दाखविलेला चाचण्यांच्या अहवालावरून या सर्वच चाचण्या मेडिकलच्या पॅथालॉजी लॅबमध्ये होत असल्याचे दिसून आले.