दोन वर्षांच्या मुलीवर पहिले 'व्होल लंग लॅव्हेज', मेडिकलच्या डॉक्टरांनी यशस्वी केली दुर्मिळ उपचार प्रक्रिया
By सुमेध वाघमार | Published: October 16, 2023 10:49 AM2023-10-16T10:49:05+5:302023-10-16T10:51:16+5:30
ही प्रक्रिया तब्बल चार तास चालली
सुमेध वाघमारे
नागपूर : दुर्मिळ असलेल्या आजारांवर अत्यंत गुंतागुंतीची व जोखमीची असलेली दुर्मिळ उपचार प्रक्रियेचे आव्हान स्वीकारून ती यशस्वी करण्याची किमया मेडिकलच्या बाल श्वसनरोग विभागाच्या डॉक्टरांनी करून दाखवली. दोन वर्षांच्या चिमुकलीची चुकीच्या उपचारातून सुटकाही केली.
मध्य प्रदेशातील सिवनी गावातील दोन वर्षीय चिमुकलीला मागील दोन महिन्यांपासून सर्दीचा त्रास होता. तिला श्वासही घेता येत नव्हता. तेथील डॉक्टरांनी न्यूमोनिया असल्याचे निदान केले. परंतु, ॲण्टिबायोटिक देऊनही आजार आटोक्यात येत नव्हता. अखेर तिच्या आई-वडिलांनी नागपूरचे मेडिकल गाठले. बाल श्वसनरोग विभागाचे प्रमुख डॉ. अभिषेक मधुरा यांनी तिला तपासले. सीटी स्कॅन काढल्यावर छातीत पाणी भरले असल्याचे दिसून आले. आणखी काही तपासणी केल्यावर चिमुकलीला ‘पल्मोनरी अल्व्होलर प्रोटिनोसिस’ (पीएपी) हा एक दुर्मिळ आजार असल्याचे निदान झाले. त्यावर ‘व्होल लंग लॅव्हेज’ (डब्ल्यूएलएल) ही परंतु किचकट, गुंतागुंतीची व जोखमीची उपचार प्रक्रिया होती. डॉ. मधुरा यांनी बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. मनीष तिवारी, बाल अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. स्वप्निल भोंगाडे, बाल बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. वृषाली अंकलवार व डॉ. मनीष पाटील यांच्या सहकार्याने जोखमीची प्रक्रिया यशस्वी करून रुग्णाला जीवनदान दिले. राज्यातील शासकीय रुग्णालयात इतक्या कमी वयाच्या मुलीवर झालेली ही पहिली ‘व्होल लंग लॅव्हेज’ उपचार प्रक्रिया होती.
- सलाइनच्या पाण्याने फुफ्फुस केले स्वच्छ
‘लोकमत’शी बोलताना डॉ. मधुरा म्हणाले, दोन वर्षांची ही चिमुकली व्हेंटिलेटवर होती. मुलीचे वय फार कमी असल्याने तिच्या अरुंद श्वसननलिकेतून नळी टाकून उजव्या भागातील फुफ्फुस सलाइनच्या पाण्याने स्वच्छ करणे आणि त्याचवेळी डाव्या भागातील फुफ्फुसाला दुसऱ्या एका नळीच्या मदतीने हवा भरणे अवघड होते. अनुभव व कौशल्याच्या बळावर ही उपचार प्रक्रिया यशस्वी केली. ही प्रक्रिया तब्बल चार तास चालली.
- ‘पीएपी’ आनुवंशिक आजार
डॉ. मधुरा म्हणाले, ‘सर्फेक्टेंट’नावाचे फुफ्फुसात तयार होणारे एक तत्त्व फुफ्फुसांना उघडे ठेवण्याचे काम करते. परंतु, या चिमुकलीमध्ये या तत्त्वाचे प्रमाण वाढून फुफ्फुसांना चिटकून होते. यामुळे श्वास घेण्यास तिला अडचण जात होती. ‘पल्मोनरी अल्व्होलर प्रोटिनोसिस’ (पीएपी) हा एक आनुवंशिक आजार आहे. तिच्यावर यशस्वी केलेल्या ‘व्होल लंग लॅव्हेज’ उपचारामुळे काही प्रमाणात तिचा त्रास कमी झाला. तिची ऑक्सिजनची मागणी कमी झाली आहे. लवकरच तिच्या डाव्या भागातील फुफ्फुसावर ही प्रक्रिया केली जाईल, असेही ते म्हणाले.