मेडिकलचे डॉक्टर कमिशनच्या मोहात!
By admin | Published: September 11, 2016 02:09 AM2016-09-11T02:09:15+5:302016-09-11T02:09:15+5:30
हल्ली कमिशन घेणे हे सामान्य समजले जाते. दुर्दैवाने वैद्यकीय क्षेत्रातही याचा समावेश झाला आहे.
गरीब रुग्णांना भुर्दंड : रक्तपिशवी, प्लेटलेट्स चाचण्यांच्या ‘क्रॉसचेक’ मधून मिळते २५ ते ५० टक्के कमिशन
सुमेध वाघमारे नागपूर
हल्ली कमिशन घेणे हे सामान्य समजले जाते. दुर्दैवाने वैद्यकीय क्षेत्रातही याचा समावेश झाला आहे. गरिबांचे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) काही निवासी डॉक्टरही या कमिशनच्या मोहात अडकले आहेत. रुग्णालयातच तपासलेल्या नमुन्यांची बाहेरील पॅथालॉजीतून फेर पडताळणी (क्रॉसचेक) करणे, खासगी रक्तपेढीतून रक्त, प्लेटलेट्स बोलविणे, विशिष्ट पॅथालॉजीतून चाचणी करणे आदी प्रकार सर्रास सुरू आहेत. यात २५ ते ५० टक्के कमिशन डॉक्टर लाटत असल्याचा प्रकार सुरू आहे.वैद्यकीय शास्त्रात उपचाराची पहिली पायरी त्या रुग्णाच्या आजाराचे प्रथमत: निदान होणे. म्हणूनच मेडिकलमध्ये पॅथालॉजी, मायक्रोबॉयोलॉजी व बॉयोकेमेस्ट्री या स्वतंत्र लॅब आहेत.
तीनही लॅबमध्ये लाखो रुपये किमतीची उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. नुकतेच बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांच्या सोईसाठी ‘सेंट्रल पॅथालॉजी लॅब’ (क्लिनिकल पॅथालॉजी ओपीडी) सुरू करण्यात आली आहे. शासनाचा यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत आहे. असे असतानाही कमिशनच्या हव्यासापोटी काही निवासी डॉक्टर रुग्णांच्या नातेवाईकांना भीती दाखवून विशिष्ट खासगी पॅथालॉजीमधून चाचण्यांची फेर पडताळणी करायला भाग पाडतात. या चाचण्या मेडिकलमध्ये होत असतानाही त्यावर अविश्वास दाखवून बाहेरून करून आणण्यास सांगतात.
रक्तपेढीत रक्ताचा किंवा प्लेटलेट्सचा तुटवडा असेल तर मेयोच्या रक्तपेढीची मदत न घेता, स्वत: पैसे घेऊन खासगीमधून बोलवून देतात.
खासगीमधून चाचण्यांचे क्रॉसचेक कधी थांबणार?
मेडिकलच्या तिन्ही लॅबमध्ये सुधारणा करीत अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी चाचण्यांची गुणवत्ता राखणे (क्वॉलिटी कंट्रोल), त्याची फेर पडताळणी (क्रॉसचेक) करणे व २४ ही तास सहायक प्राध्यापकांच्या देखरेखेखाली नमुन्यांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार कामही सुरू आहे. परंतु काही निवासी डॉक्टर रुग्णांच्या नातेवाईकांना मेडिकलच्या चाचण्यांच्या अहवालावर विश्वास नसल्याचे सांगून एका खासगी लॅबमधून चाचण्या ‘क्रॉसचेक’ करायला सांगतात. याचा मोठा भुर्दंड गरीब रुग्णांना बसत आहे. मेडिकलच्याच वॉर्ड ३५ मध्ये याचे ताजे उदाहरण समोर आले आहे.
वॉर्डा-वॉर्डात फिरतात एजंट
मेडिकलच्या अतिदक्षता विभागापासून ते अनेक वॉर्डा-वॉर्डात खासगी रक्तपेढीचे, लॅबचे एजंट फिरतात. अनेक निवासी डॉक्टरांचे या एजंटशी संबंध असल्याचे बोलले जाते. उल्लेखनीय म्हणजे, या संदर्भातील काही वरिष्ठ डॉक्टरांना याची माहिती आहे. परंतु जाणीवपूर्वक ते याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, अशा डॉक्टरांचा कमिशनचा मोह पूर्ण होत आहे.