मेडिकलमधील डॉक्टरांनी नक्षलग्रस्त भागात जाऊन केली शस्त्रक्रिया; १२ रुग्णांना दिले नवे आयुष्य

By सुमेध वाघमार | Published: March 21, 2024 08:36 PM2024-03-21T20:36:47+5:302024-03-21T20:42:06+5:30

कुष्ठरोगामुळे वाकडे झालेल्या हात-पायावर सर्जरी

Medical doctors went to Naxalite affected areas and performed surgery 12 patients given new life | मेडिकलमधील डॉक्टरांनी नक्षलग्रस्त भागात जाऊन केली शस्त्रक्रिया; १२ रुग्णांना दिले नवे आयुष्य

मेडिकलमधील डॉक्टरांनी नक्षलग्रस्त भागात जाऊन केली शस्त्रक्रिया; १२ रुग्णांना दिले नवे आयुष्य

सुमेध वाघमारे, नागपूर: विदर्भात कुष्ठरोगाचे सर्वाधिक रुग्ण गडचिरोली जिल्ह्यात आढळून येतात. कुष्ठरोगामुळे येणारी शारीरिक विकृती आणि अपंगत्व ही त्या व्यक्तींच्या आरोग्यावर आणि जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम करते. याची दखल घेत नागपूर मेडिकलमधील प्लास्टिक सर्जरी विभागाचा चमूने गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागात जावून कुष्ठरोगाच्या रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यांना नवे आयुष्य दिले.

कुष्ठरोग म्हणजे ‘लेप्रसी’. या रोगाचे कारण ‘मायकोबॅक्टेरियम लेप्रे’ नावाचा जिवाणू असतो. जर तो बराच काळ एखाद्या माणसाच्या शरीरात टिकून राहिला तर शरीरातले मज्जातंतू, त्याची त्वचा आणि त्याची हाडे खराब करून टाकतो. कुष्ठरोगात महाराष्टÑ चवथ्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक रुग्ण विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा व गोंदिया या चार जिल्ह्यात आढळून येतात. सहायक संचालक आरोग्य विभागाच्या गडचिरोली येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये कुष्ठरोगावर उपचारासाठी आलेल्या १५वर रुग्णांची तपासणी केली. यातील १२ रुग्णांमधील कोणाचे हात तर कोणाचे पाय वाकडे झाले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियेची गरज होती.

आरोग्य विभागाने मेडिकलच्या प्लास्टिक सर्जरी विभागाशी संपर्क साधला त्यांनी गडचिरोली येथे येऊन शस्त्रक्रिया करण्याची विनंती केली. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत डॉ. पाटील व त्यांच्या डॉक्टरांच्या चमूने २ मार्च रोजी गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त प्रभावित भागात जाऊन कुष्ठरोग रुग्णांची तपासणी केली. १५ आणि १६ मार्च रोजी त्यातील १२ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. यात सहा महिला व सहा पुरुष रुग्ण होते. ही सर्जरी डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनात व राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाचे सहायक संचालक डॉ. सचिन हेमकेयांच्या पुढाकारात डॉ. सुखेन दोशी, डॉ. मयंक भासीन, डॉ.प्रभाकर रोखोंडे, डॉ. अंशू गांधी आणि डॉ. वर्षा पटनाइक आदींनी यशस्वी केली. यात गडचिरोली येथील सिव्हील हॉस्पिटलमधील डॉक्टर व बधिरीकरण तज्ज्ञाचीही मदत झाली. 

कुष्ठरोगावरील शस्त्रक्रिया जीवनाची गुणवत्ता वाढवते

कोरोनापूर्वी मेडिकलच्या डॉक्टरांची चमू गडचिरोली जिल्ह्यात जाऊन जवळपास १०० कुष्ठरोगाचा रुग्णांची तपासणी केली होती. त्यातील १० ते १२ रुग्णांवर शस्त्रक्रिया केली. उर्वरीत रुग्णांना मेडिकलला येण्यास सांगितले होते. परंतु कोणीच नाही. या रुग्णांची बोली भाषा वेगळी असल्याने ते नागपुरात येण्यास तयार नसल्याचे समजते. यामुळे या वर्षी आम्ही तिथे जाऊन शस्त्रक्रिया केली. या रुग्णांवरील ही शस्त्रक्रिया जीवनाची गुणवत्ता वाढवणारी ठरेल. 
-डॉ. नरेंद्र पाटील, प्रमुख प्लास्टिक सर्जरी विभाग मेडिकल

Web Title: Medical doctors went to Naxalite affected areas and performed surgery 12 patients given new life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर