मेडिकलचे डॉक्टर आता दिसणार ‘अॅप्रॉन’मध्ये; सुसंवाद वाढविण्याचाही प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2022 08:34 PM2022-08-23T20:34:51+5:302022-08-23T20:35:48+5:30
Nagpur News शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) डॉक्टर आता पांढरा कोट म्हणजे ‘अॅप्रॉन’मध्ये दिसणार आहे.
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) डॉक्टर आता पांढरा कोट म्हणजे ‘अॅप्रॉन’मध्ये दिसणार आहे. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांनी याबाबतचे निर्देश सर्व विभागप्रमुखांना दिले. विशेष म्हणजे, या माध्यमातून डॉक्टर-रुग्णांमध्ये सुसंवाद वाढविण्याच्या प्रयत्नालाही त्यांनी हात घातला आहे.
शासकीय रुग्णालय तथा वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर, विद्यार्थी, अध्यापक तसेच तंत्रज्ञांना ‘अॅप्रॉन’ घालूनच कार्यरत राहावे, असा ‘मेडिकल इथिक्स’चा नियम आहे. मात्र वैद्यकीय शिक्षण विभागाचे कोणी मोठे अधिकारी किंवा नेते मंडळी आल्यावरच वरिष्ठ डॉक्टरांपासून ते कनिष्ठ डॉक्टरांना ‘अॅप्रॉन’ची आठवण होत होती. ‘अॅप्रॉन’ नसल्याने मेडिकलच्या गर्दीत डॉक्टर-रुग्ण ओळखणे कठीण झाले होते. परिणामी, गैरसमज निर्माण होऊन वादाचे प्रसंग निर्माण होत होते.
याचीच दखल घेत तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी २०१४ मध्ये सर्व डॉक्टरांना ‘अॅप्रॉन’ची सक्ती केली. ‘अॅप्रॉन’ न घातलेल्या डॉक्टरांना ते आपल्या केबिनमध्ये येऊ देत नव्हते. यामुळे डॉक्टरांच्या अंगावर कधी नव्हे ते ‘अॅप्रॉन’ दिसू लागले. परंतु डॉ. निसवाडे हे निवृत्त होताच ‘अॅप्रॉन’चाही विसर पडला. ‘लोकमत’ने २२ आॅगस्टच्या अंकात ‘कोण डॉक्टर, कोण रुग्ण, समजणार कसे?’ या मथळ्याखाली या वृत्ताला वाचा फोडली. याची गंभीर दखल अधिष्ठाता डॉ. गुप्ता यांनी घेतली. त्यांनी मंगळवारी विभागप्रमुखांच्या नावे पत्र काढून कनिष्ठ व वरिष्ठ डॉक्टरांना अॅप्रॉन घालण्याचे निर्देश दिले. त्याची जबाबदारी सर्व विभागप्रमुखांवरही टाकली. यामुळे मंगळवारी बहुसंख्य डॉक्टर ‘अॅप्रॉन’मध्ये दिसले.
-‘अॅप्रॉन’ची जबाबदारी विभागप्रमुखांवर -डॉ. सुधीर गुप्ता
‘लोकमत’शी बोलताना अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले, वरिष्ठांपासून ते कनिष्ठ डॉक्टरांनी अॅप्रॉन घालूनच रुग्णसेवा देणे अपेक्षित आहे. परंतु अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने विभागप्रमुखांच्या नावाने पत्र काढून त्यांच्या विभागातील डॉक्टरांनी अॅप्रॉन घालण्याचे निर्देश दिले. रुग्णालयाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी याची मदत होईल, असेही ते म्हणाले.