मेडिकलचे प्रवेशद्वार पाण्यात
By admin | Published: June 22, 2015 02:50 AM2015-06-22T02:50:54+5:302015-06-22T02:50:54+5:30
प्रवेशद्वारासमोरच पावसाचे पाणी साचल्याने रुग्णांना पाण्यातून वाट काढावी लागते. गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे येथे गुडघाभर पाणी साचून आहे.
आकस्मिक विभाग : उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना पाण्यातून काढावी लागते वाट
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) बाह्यरुग्ण विभाग बंद झाल्यानंतर येणाऱ्या गंभीर आजाराच्या रुग्णांना एकाच ठिकाणी अद्ययावत सर्व उपचार मिळावे म्हणून दोन वर्षांपूर्वी तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून आकस्मिक वैद्यकीय सेवा विभाग उभा केला. परंतु उद्घाटन होत नाही तोच नियोजनाअभावी हा विभाग अनेक समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. विशेषत: प्रवेशद्वारासमोरच पावसाचे पाणी साचल्याने रुग्णांना पाण्यातून वाट काढावी लागते. गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे येथे गुडघाभर पाणी साचून आहे.
मेडिकलमध्ये वाढलेली रुग्णसंख्या, अपुरी जागा व विविध चाचण्यांकरिता या विभागातून दुसऱ्या विभागात रुग्णांची होणारी धावपळ, यामुळे उपचार मिळण्यास होणारा उशीर यावर उपाय म्हणून २०११ मध्ये नव्या आकस्मिक वैद्यकीय सेवा विभागाचे बांधकाम हाती घेण्यात आले. हा विभाग तीन मजल्यांचा होणार होता. यातील तळमजल्यावर स्वागत कक्ष, नोंदणी कक्ष, मुख्य अपघात वैद्यकीय अधिकारी यांचे कक्ष, समन्वय कक्ष, २० खाटांची सोय, अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया कक्ष, एक्स-रे कक्ष, प्रसुती विभाग, डॉक्टरांची खोली, डार्क रुम व परिचारिकांची खोली असणार होती. परंतु दोन कोटी रुपये खर्च करून हा विभाग केवळ तळमजल्यापुरताच मर्यादित राहिला. यातही अनेक विभाग आजही कुलूपात बंद आहेत. जुन्या आकस्मिक कक्षापेक्षा या कक्षात रुग्णांवर उपचार करणे दिवसेंदिवस कठीण जात होते. पुरुषोत्तम कडव या रुग्णांवरील उपचारात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांच्या नातेवाईकांनी तोडफोड केली होती. त्यानंतरही या विभागात आवश्यक सुधारणा झाल्या नाहीत. डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी अधिष्ठात्यांची जबाबदारी स्वीकारताच सहा महिन्यातच त्यांनी ‘सर्जरी’चा आकस्मिक विभाग वेगळा करून तो जुन्या आकस्मिक विभागात सुरू केला. यामुळे नव्या आकस्मिक विभागावरील भार कमी झाला. कामकाजात सुरळीतपणा आला. परंतु बांधकाम विभागाच्या चुकांचा फटका आजही रुग्णांना बसत आहे. नव्या कॅज्युल्टीच्या प्रवेशद्वारासमोरील परिसर उंच केल्याने आणि पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या काढण्यात न आल्याने प्रवेशद्वाराजवळच पावसाचे पाणी साचून राहते. मुसळधार पावसामुळे येथे गुडघाभर पाणी साचले आहे.(प्रतिनिधी)