मिहानमध्ये वैद्यकीय उपकरणे उत्पादक कंपन्या
By admin | Published: September 21, 2016 03:08 AM2016-09-21T03:08:10+5:302016-09-21T03:08:10+5:30
वैद्यकीय उपकरणांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या मिहान-सेझमध्ये उत्पादन युनिट सुरू करणार आहेत.
एआयएमडीए असोसिएशनतर्फे पाहणी : एकाच छताखाली युनिट
वसीम कुरैशी नागपूर
वैद्यकीय उपकरणांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या मिहान-सेझमध्ये उत्पादन युनिट सुरू करणार आहेत. या संदर्भात भारतीय वैद्यकीय उपकरणे असोसिएशनच्या (एआयएमडीए) पदाधिकाऱ्यांनी पूर्वीच जागेची पाहणी केली आहे. मंगळवारी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) अधिकाऱ्यांसोबत या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे.
देशात वैद्यकीय उपकरणे निर्मितीचा मोठा व्यवसाय आहे. वेगवेगळ्या उपकरणांची आता एकाच छताखाली निर्मिती करण्याच्या दिशेने अखिल भारतीय वैद्यकीय उपकरण असोसिएशन (एआयएमडीए) प्रयत्न करीत आहे. उत्पादनाचे केंद्रीकरण करण्यासाठी एमआयएमडीएच्या पदाधिकाऱ्यांनी नागपूरला पसंती दिली आहे.
‘एआयएमडीए’ने पाहणी केल्यानंतर एमएडीसी एसईझेडबाहेर उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी व्यवहार्यता आकलन करीत आहे. यासाठी सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात ३ सप्टेंबरला निविदा काढण्यात आल्या असून १४ आॅक्टोबरपर्यंत निविदा आमंत्रित करण्यात आल्या आहेत.
सल्लागारांसोबत बैठक
वैद्यकीय उपकरणे निर्मिती युनिट संदर्भात एमएडीसीचे अधिकारी आणि सल्लागारांमध्ये मंगळवारी बैठक झाली. एमएडीसीचे विपणन अधिकारी अतुल ठाकरे यांनी सांगितले की, सल्लागारांच्या माध्यमातून युनिटसाठी किती जमीन आणि कोणती संशाधने व मूलभूत सुविधा आवश्यक राहील, याची माहिती करून घेण्यात येत आहे. त्यानंतर जमीन देण्यात येणार आहे.