मिहानमध्ये वैद्यकीय उपकरण निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 01:31 AM2017-09-10T01:31:12+5:302017-09-10T01:32:45+5:30
‘कॉक्लीअर इम्प्लांट’मुळे मूकबधिरपण टाळता येतो. मात्र हे यंत्र पाश्चात्त्य देशातून खरेदी करावे लागत असल्याने याची किंमत सहा-सात लाख रुपये आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कॉक्लीअर इम्प्लांट’मुळे मूकबधिरपण टाळता येतो. मात्र हे यंत्र पाश्चात्त्य देशातून खरेदी करावे लागत असल्याने याची किंमत सहा-सात लाख रुपये आहे. गरीब रुग्ण हे यंत्र खरेदी करू शकत नाही. यामुळे देशातच वैद्यकीय उपकरण तयार करण्याला प्रोत्साहन दिले जात आहे. मिहानमध्ये या सारख्या काही वैद्यकीय उपकरण निर्मितीसाठी प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) शनिवारी राज्यातील शासकीय रुग्णालयातील पहिल्या ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय देशमुख, सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे, पद्मश्री डॉ. मिलिंद कीर्तने, मेयोच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे उपस्थित होत्या.
गडकरी म्हणाले, राज्यात शासकीय रुग्णालयात ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ केंद्र सुरू होणे ही आनंदाची बाब आहे. जन्मत:च कर्णबधिर असलेल्या लहान मुलांसाठी हे केंद्र नवजीवन देईल. या केंद्रामधून डॉ. कीर्तने यांनी नवनवीन डॉक्टरांना प्रशिक्षण द्यावे. ह्यडीआरडीओह्ण म्हणजेच संरक्षण संशोधन व विकास विभागाच्या मदतीने या यंत्राची किमत कशी कमी करता येईल याबाबत संरक्षण मंत्रालयासोबत लवकरच चर्चा करण्यात येईल.
याविषयी डॉ. कीर्तने यांनी आपला प्रस्ताव द्यावा, असेही गडकरी म्हणाले.
खासगी उपचारासाठी सावकाराचे कर्ज
गडकरी म्हणाले, खासगी वैद्यकीय सेवा खूप महागल्या आहेत. अनेकवेळा रुग्णांच्या नातेवाईकांना उपचाराचा खर्च भागविण्यासाठी सावकारांकडून कर्ज घ्यावे लागते. त्यामुळे आता शासकीय रुग्णालयांच्या जबाबदाºया वाढल्या आहेत. या रुग्णालयांमधून रुग्णांना चांगली सेवा मिळायला हवी.
बोगस कंपनीच्या लिफ्टची चौकशी करा
मेयोच्या नवीन इमारतीचे चांगले बांधकाम झाले आहे. परंतु येथील लिफ्टची गुणवत्ता दर्जाहीन आहे. बोगस कंपनीची लिफ्ट असावी, अशी शंका आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांनी याची चौकशी करावी, अशा सूचनाही गडकरी यांनी दिल्या.
संचालन डॉ. सुषमा ठाकरे यांनी तर आभार डॉ. जीवन वेदी यांनी मानले. यावेळी डॉ. विरल कामदार, आयएमएच्या अध्यक्ष डॉ. वैशाली खंडाईत, डॉ. रवी चव्हाण यांच्यासह रुग्णालयातील सर्व वरिष्ठ डॉक्टर उपस्थित होते.