जेवणाची तपासणी करणार मेडिकल
By admin | Published: April 12, 2017 01:46 AM2017-04-12T01:46:09+5:302017-04-12T01:46:09+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ एप्रिल रोजी नागपुरात यत आहेत. या दौऱ्यासाठी मेडिकल प्रशासनाने तीन चमू तयार केल्या आहेत.
पंतप्रधानांचा दौरा : वैद्यकीय सेवेसाठी असणार डॉक्टरांचे पथक
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ एप्रिल रोजी नागपुरात यत आहेत. या दौऱ्यासाठी मेडिकल प्रशासनाने तीन चमू तयार केल्या आहेत. गुरुवार १३ एप्रिलपासून डॉक्टरांच्या चमू सेवेत राहणार आहेत. विशेष म्हणजे, पंतप्रधानांच्या जेवणाच्या तपासणीची जबाबदारी मेडिकलच्या चमूवर देण्यात आल्याची माहिती आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्यात आरोग्यासंबंधित आपत्ती येऊ नये आणि आल्यास संबंधितांवर ताबडतोब उपचार करण्यासाठी मेडिकल, मेयो व आरोग्य विभागाच्या प्रशासनाने कंबर कसली आहे. पंतप्रधान दीक्षाभूमी, मानकापूर व कोराडी येथे जाणार आहेत. या दौऱ्यात कसूर राहू नये यासाठी आरोग्य विभागाने अतिशय सूक्ष्म नियोजन केले आहे. मेडिकलने तीन चमू तयार केल्या आहेत. एका चमूत सहायक प्राध्यापक, मेडिसीन, सर्जरी, अॅनेस्थेशिया, परिचारिका, अटेंडंट व वाहनचालक आदी सहा कर्मचारी असे मिळून १८ जण दौऱ्यात सेवेसाठी राहणार आहेत. सकाळ, दुपार व सायंकाळ अशा तीन वेळेत चमू सेवा देणार आहे. चमूसोबत एकूण तीन रुग्णवाहिकाही सेवेत असतील. यात एक मेडिकलची तर दोन आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिकेचा समावेश असेल. पंतप्रधान १४ ला तर राज्यपाल १३ एप्रिलला येणार असल्याने वैद्यकीय चमू १३ एप्रिलच्या सकाळपासूनच सेवेत राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मोदींच्या सुरक्षा पथकातील वाहने बुधवारी नागपुरात पोहोचणार आहेत. त्यानंतर ‘फुलप्रूफ’ तालीम होणार आहे. (प्रतिनिधी)
दीक्षाभूमीवर ध्यानसाधना
सुरक्षा यंत्रणेने घेतला आढावा : कोराडी व मानकापूर क्रीडा संकुलाचीही केली पाहणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी दीक्षाभूमीवर ध्यानसाधना करणार आहेत. त्यांचा दौरा जवळ येत असल्याने मंगळवारी एसपीजी अधिकाऱ्यांसोबत शहर पोलिसांसोबत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदी १४ एप्रिल रोजी विमानतळावरून सरळ दीक्षाभूमीत पोहोचणार आहेत. त्यांच्या कार्यक्रमानुसार सकाळी ११.४५ वाजता ते दीक्षाभूमीवर पोहोचणार आहेत. स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे व राजेंद्र गवई त्यांचे स्वागत करतील. दीक्षाभूमीवर येऊन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करतील. त्यानंतर दीक्षाभूमीवरील स्तुपात जाऊन अस्थिकलशाचे दर्शन घेऊन कॅन्डल लावतील. त्यानंतर किमान ५ मिनिट ते स्तुपात ध्यान करतील. त्यानंतर ते आगंतुक पुस्तिकेवर प्रतिक्रिया लिहितील. त्यानंतर ते स्तुपातील पहिल्या माळ्यावरील ध्यान कक्षाचीसुद्धा पाहणी करतील. किमान १५ मिनिटे दीक्षाभूमीवर घालविल्यानंतर पंतप्रधान कोराडीकडे रवाना होतील. दीक्षाभूमी व मानकापूर क्रीडा संकुलच्या आयोजनाच्या सुरक्षेला घेऊन सुरक्षा एजन्सी सतर्क झाल्या आहेत. मंगळवारी सकाळी ११ वाजता पंतप्रधानाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एसपीजीचे अधिकारी सुरेश मौर्या व डी. एम. मान यांनी डीसीपी दीपाली मासिरकर व रवींद्रसिंह परदेशी यांच्यासोबत विमानतळाच्या सुरक्षेचा आढावा घेतला. त्यानंतर दीक्षाभूमी, कोराडी व मानकापूर क्रीडा संकुलाच्या सुरक्षेचा आढावा घेतला.