मेडिकलमध्ये सलाईन नाही, टाक्यांसाठी धागाही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:09 AM2021-07-27T04:09:09+5:302021-07-27T04:09:09+5:30

नागपूर : गरिबांसाठी आशेचा किरण असलेल्या मेडिकलमध्ये पैसे असतील तरच रुग्णांवर उपचार होत असल्याने रुग्णसेवा अडचणीत आली आहे. आशिया ...

Medical has no saline, no thread for tanks | मेडिकलमध्ये सलाईन नाही, टाक्यांसाठी धागाही नाही

मेडिकलमध्ये सलाईन नाही, टाक्यांसाठी धागाही नाही

googlenewsNext

नागपूर : गरिबांसाठी आशेचा किरण असलेल्या मेडिकलमध्ये पैसे असतील तरच रुग्णांवर उपचार होत असल्याने रुग्णसेवा अडचणीत आली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या दुसऱ्या क्रमांकाच्या या रुग्णालयातील दुरवस्थेची तक्रार मेडिकलच्या निवासी डॉक्टरांनी थेट वैद्यकीय शिक्षण विभागाकडे केली आहे.

औषधे व यंत्रसामग्री खरेदीचे केंद्रिकरण करण्यात आले असले तरी चार वर्षे उलटूनही त्याचा विशेष फायदा होताना दिसून येत नसल्याचे चित्र आहे. रुग्णालयांना लागणाऱ्या औषधांचा निधी ‘हाफकिन बायो-फार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड’कडे वळता केल्यानंतरही तातडीने औषधी उपलब्ध होत नसल्याचे वास्तव आहे. याचा फटका गरीब रुग्णांना बसत आहे. त्यांना पदरमोड करून बाहेरून औषधी विकत आणावी लागत आहे. अनेकांकडे पैसे राहत नसल्याने त्यांच्यावरील उपचाराचा प्रश्न निवासी डॉक्टरांना पडला आहे.

- औषधेच नाहीत, उपचार कसे करावेत?

मेडिकलमध्ये उपलब्ध नसलेल्या ४६ औषधी व साहित्याची यादीच ‘मार्ड’ने वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठवली. यात २५ वर जीवरक्षक औषधींचा समावेश आहे. यादीत ‘आयव्ही सेट’, ‘नॉर्मल सलाईन’पासून ते हृदय बंद पडल्यानंतर तातडीने दिले जाणारे ‘ नोरॅड्रेनलिन’, ‘अ‍ॅड्रेनलिन’ इंजेक्शन, जखम शिवण्यासाठी लागणारा धागा, ग्लोव्हज्‌, टीटीचे इंजेक्शन, बेटॅडीन आदींचा समावेश आहे. औषधेच नसल्याने उपचार तरी कसा करावा, असा प्रश्नही डॉक्टरांनी उपस्थित केला आहे.

- चाचण्याही बंद

आजाराचे निदान करण्यासाठी मेडिकलचे दरवर्षी कोट्यवधी रुपये चाचण्यांवर खर्च होतात. परंतु महत्त्वाच्या चाचण्याच बंद असल्याने, हा खर्च जातो कुठे, हा प्रश्न आहे. सध्या मेडिकलमध्ये ‘सीबीसी’, ‘केएफटी’, ‘एलएफटी’, ‘एस.ई’, ‘एबीजी’ या चाचण्या रुग्णांना बाहेरून करण्यास सांगितले जात आहे.

...अन्यथा आंदोलन

मेडिकलमध्ये औषधींचा तुटवडा पडल्याने व चाचण्या होत नसल्याने निवासी डॉक्टरांना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या रोषाला समोर जावे लागत आहे. याची माहिती वरिष्ठांना दिली, परंतु कोणीच लक्ष दिले नाही. यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाला पत्र द्यावे लागले. औषधी उपलब्ध न झाल्यास व बंद चाचण्या सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा निर्णय ‘मार्ड’ने घेतला आहे.

- डॉ. सजल बन्सल, अध्यक्ष, ‘मार्ड’ मेडिकल

Web Title: Medical has no saline, no thread for tanks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.