मेडिकल : ‘मार्ड’चा बेमुदत संप आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 12:04 AM2019-08-07T00:04:56+5:302019-08-07T00:06:17+5:30
‘नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी) विधेयकाला विरोध, उशिरा मिळणारे विद्यावेतन व कमी विद्यावेतनाला घेऊन निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने बुधवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे रुग्णसेवा प्रभावित होऊ नये म्हणून मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी सर्व वरिष्ठ डॉक्टरांच्या सुट्या रद्द केल्या आहेत. विशेष म्हणजे, रुग्णसेवेत ‘नॉन क्लिनीकल’ डॉक्टर, इन्टर्न व एमबीबीएसच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी) विधेयकाला विरोध, उशिरा मिळणारे विद्यावेतन व कमी विद्यावेतनाला घेऊन निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने बुधवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे रुग्णसेवा प्रभावित होऊ नये म्हणून मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी सर्व वरिष्ठ डॉक्टरांच्या सुट्या रद्द केल्या आहेत. विशेष म्हणजे, रुग्णसेवेत ‘नॉन क्लिनीकल’ डॉक्टर, इन्टर्न व एमबीबीएसच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे.
‘एनएमसी’ विधेयकाच्या विरोधात ‘सेंट्रल मार्ड’ने पुढाकार घेतला आहे. सोबतच वेळेवर व वाढीव विद्यावेतनचा तिढा कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी ७ ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारला आहे. विशेष म्हणजे, संपाच्या एकदिवस अगोदर शासनाने तीन महिन्याच्या विद्यावेतनाचा निधी मेडिकलचा तिजोरीत जमा केला आहे. परंतु संपाचे हत्यार उपसल्यावरच निधी का उपलब्ध होतो, असा प्रश्न मेडिकल मार्डचे अध्यक्ष डॉ. मुकुल देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. तर संपाला घेऊन अधिष्ठाता डॉ. मित्रा यांनी आज ‘कॉलेज कौन्सिल’ घेतली. यात सर्व वरिष्ठ डॉक्टरांच्या सुट्या रद्द करण्यात येत असल्याचे सांगितले.
शस्त्रक्रिया प्रभावित होणार नाही
‘लोकमत’शी बोलताना डॉ. मित्रा म्हणाले, संपामुळे शस्त्रक्रिया प्रभावित होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी तसे नियोजन करण्याचा सूचना सर्व विभाग प्रमुखांना दिल्या आहेत. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसादही मिळाला आहे. या शिवाय, ओपीडी ते वॉर्डातील रुग्णसेवा विस्कळीत होऊ नये यासाठी वरिष्ठ डॉक्टरांचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.
‘नॉन क्लिनीकल’ डॉक्टर रुग्णसेवेत
शरीररचनाशास्त्र विभाग, रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधशास्त्र विभाग आणि न्यायवैद्यकशास्त्र विभाग या ‘नॉन क्लिनीकल’ डॉक्टरांची मदत रुग्णसेवेत घेतली जाणार असल्याची माहिती डॉ. मित्रा यांनी दिली. ते म्हणाले, आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ निवासी डॉक्टर यांच्याकडेही रुग्णसेवेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. इन्टर्न व एमबीबीएसचा अंतिम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांची मदतही घेतली जाणार आहे.
संप लांबल्यास आरोग्य विभागाची मदत
डॉ. मित्रा म्हणाले, संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न होत आहे, परंतु त्यानंतरही संप लांबल्यास आरोग्य विभागाच्या डॉक्टरांची मदत घेतली जाईल, या संदर्भात एक पत्र आरोग्य विभागाला देण्यात आले आहे. वरिष्ठांच्या निर्देशानुसार कठोर निर्णयही घेण्यात येतील, असेही डॉ. मित्रा म्हणाले.