मेडिकल-मेयोचे हाल बेहाल! सलाईन संपली, दुसरी लावण्यास नर्सच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2023 08:15 PM2023-03-15T20:15:32+5:302023-03-15T20:16:04+5:30
Nagpur News परिचारिका, तंत्रज्ञ, फार्मासिस्ट व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या दिवसाच्या संपामुळे शासकीय रुग्णालयांतील रुग्णसेवा पूर्णत: कोलमडली आहे.
नागपूर : परिचारिका, तंत्रज्ञ, फार्मासिस्ट व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या दिवसाच्या संपामुळे शासकीय रुग्णालयांतील रुग्णसेवा पूर्णत: कोलमडली आहे. मेयो, मेडिकलमधील आज नियोजित १०० वर शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. वॉर्डावॉर्डांतील स्थिती तर भयानक होती. सलाइन संपली तरी दुसरी लावण्यास नर्स नव्हत्या. त्यात वरिष्ठ डॉक्टर वॉर्डाकडे दिवसातून एकदाच फिरकत असल्याने संपूर्ण भार निवासी डॉक्टरांवर आला. त्यांना उपचारासोबतच नर्सेस आणि टेक्निशियनचेही काम करावे लागत असल्याने गोंधळ उडाला होता.
जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), डागा शासकीय स्त्री रुग्णालय, प्रादेशिक मनोरुग्णालय आणि शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयातील जवळपास १५०० वर परिचारिका संपात सहभागी झाल्या आहेत. रुग्णसेवेचा कणा असलेल्या परिचारिकाच नसल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. त्यात भर म्हणून तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारीही संपात सहभागी असल्याने शासकीय रुग्णालयात कशीबशी इमर्जन्सी रुग्णसेवा दिली जात आहे. उद्या गुरुवारपासून ही स्थिती आणखी नाजूक होण्याची शक्यता आहे.
-मेडिकल : ७५८ रुग्णांचा भार ८६ नर्सिंग विद्यार्थ्यांवर
मेडिकलमध्ये खाटांची संख्या १६२१ आहे. सद्य:स्थितीत ७५८ रुग्ण भरती आहेत. त्यांच्यासेवेत नर्सिंग कॉलेजच्या केवळ २५० विद्यार्थी आहेत. एका पाळीत केवळ ८६ विद्यार्थ्यांवर या रुग्णांचा भार आला आहे. यातही अनेकांना सलाइन, इंजेक्शनही लावता येत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५८ किरकोळ, तर फक्त ४ इमर्जन्सी शस्त्रक्रिया झाल्या.
- सर्वच वॉर्ड वाऱ्यावर
प्रस्तुत प्रतिनिधीने मेडिकलच्या वॉर्ड क्र. ६ या लहान मुलांच्या वॉर्डाचा कानोसा घेतला असता सायंकाळदरम्यान वॉर्डात निवासी डॉक्टर किंवा नर्सिंगचे विद्यार्थी दिसून आले नाही. येथील एक महिला अटेंडन्स रुग्णांवर लक्ष ठेवून होती. येथे एकेका वॉर्मरवर दोन-तीन बालके ठेवण्यात आली होती; परंतु त्याकडे लक्ष देण्यास कोणीच नव्हते. अशीच स्थिती बहुसंख्य वॉर्डाची होती.
-मेयोमध्ये सकाळच्या सत्रात १३, तर दुपारच्या सत्रात ४ नर्सेस
मेयोमध्ये बुधवारी ४२७ रुग्ण भरती होते. त्या तुलनेत सकाळच्या सत्रात १३, तर दुपारच्या सत्रात केवळ ४ नर्सेस कर्तव्यावर होत्या. त्यांच्या मदतीला नर्सिंग कॉलेजच्या ३० विद्यार्थिनी होत्या; परंतु त्या नवख्या असल्याने कामे प्रभावित झाली होती. बुधवारी मेयोमध्ये १९ इमर्जन्सी शस्त्रक्रिया, तर ३ किरकोळ शस्त्रक्रिया झाल्या.
-डागा रुग्णालयात तारांबळ
संपाचा बुधवारी दुसरा दिवस, यातच प्रसूतीसाठी आलेल्यांची संख्या वाढल्याने डागा रुग्णालयात सकाळपासून तारांबळ उडाली; परंतु येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा पारवेकर या जातीने लक्ष देऊन असल्याने उशिरा का होईना सर्वांना उपचार मिळत होते. सायंकाळी ६ वाजेपर्यंत या रुग्णालयात १० सिझर झाले होते.
-प्रोशिक मनोरुग्णालयाची स्थिती बिकट
प्रादेशिक मनोरुग्णालयात सध्याच्या स्थितीत ४५० रुग्ण भरती आहेत; परंतु परिचारिका व अटेंडन्ट नसल्याने रुग्णांना आंघोळ घालणे, कपडे घालून देणे, जेऊ घालणे आदी कामे खोळंबली होती. संपाचा सर्वाधिक फटका येथील रुग्णांना बसला. रुग्णालयाची स्थिती बिकट झाली आहे.
-सुपरमधील शस्त्रक्रिया बंद
मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आज सकाळच्या सत्रात एकही परिचारिका नव्हती. यामुळे आज शस्त्रक्रिया झाल्याच नाहीत. रुग्णांवरील ॲन्जिओप्लास्टीसुद्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.