मेडिकल, मेयोला करणार ‘बेस्ट’
By admin | Published: May 29, 2016 03:05 AM2016-05-29T03:05:58+5:302016-05-29T03:05:58+5:30
शासकीय रुग्णालयांवर रुग्णांचा भार वाढत आहे. या स्थितीही डॉक्टर उत्कृष्ट सेवा देत आहेत.
देवेंद्र फडणवीस : मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरचे उद्घाटन व आयसीसीयूचे भूमिपूजन
नागपूर : शासकीय रुग्णालयांवर रुग्णांचा भार वाढत आहे. या स्थितीही डॉक्टर उत्कृष्ट सेवा देत आहेत. परंतु शासकीय महाविद्यालय व रुग्णालयांची गौरवशाली परंपरा ढासळत चालली आहे. ती पुन्हा प्राप्त व्हावी यासाठी येत्या तीन-चार वर्षांत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील आणि देशातील ‘बेस्ट’ कॉलेजमध्ये मेयो व मेडिकलची ओळख निर्माण होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या ‘ट्रॉमा केअर सेंटर’च्या इमारतीचे उद्घाटन व अतिदक्षता विभागाच्या बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, आमदर सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, सुधाकर देशमुख, नागो गाणार, भाजपाचे महामंत्री व नगरसेवक संदीप जोशी, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव मेघा गाडगीळ, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे उपसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरची गेल्या सात-आठ वर्षांपासून केवळ चर्चा सुरू हाती. गेल्या दोन वर्षांपासून याचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अत्याधुनिक सुविधेसह रुग्णांच्या सेवेसाठी हे केंद्र सज्ज झाले आहे. मध्य भारतातील गरजू ग्णांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या केंद्रामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळेल. (प्रतिनिधी)
अपघातात १ लाख ६८ हजार
लोकांचा मृत्यू
अध्यक्षीय भाषणात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले, देशात दरवर्षी पाच लाख अपघात होतात. गेल्या वर्षी अपघातामध्ये १ लाख ६८ लोकांचा बळी गेला. ही संख्या एखाद्या युद्धापेक्षाही मोठी आहे. अपघातांच्या कारणांचा शोध घेण्यासोबतच अपघात झाल्यानंतर तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळावी यासाठी ट्रॉमा केअर सेंटरची आवश्यकता मध्य भारतात पूर्ण होत आहे. राज्यातील व देशातील अपघातप्रवण स्थळ शोधून त्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. येत्या दोन वर्षांत अपघाती मृत्यूची संख्या ५० टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य आहे, असेही ते म्हणाले.