मेडिकल, मेयोचे डॉक्टर आजपासून संपावर
By admin | Published: September 27, 2015 02:40 AM2015-09-27T02:40:39+5:302015-09-27T02:40:39+5:30
मुंबईच्या केईएम रुग्णालयात शुक्रवारी रुग्णांच्या नातेवाईकांनी तीन निवासी डॉक्टरांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ ...
अधिष्ठात्यांना दिली नोटीस : आरोग्य व्यवस्था कोलमडणार!
नागपूर : मुंबईच्या केईएम रुग्णालयात शुक्रवारी रुग्णांच्या नातेवाईकांनी तीन निवासी डॉक्टरांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ नागपुरातील मेडिकल व मेयो रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी शनिवारी काळ्या फिती लावून काम केले. मात्र, मारहाण करणाऱ्या चारही आरोपींना अटक करण्याच्या मुख्य मागणीवर शनिवारी तोडगा निघाला नाही. परिणामी, सेंट्रल मार्डने आज, रविवारी रात्री ८ वाजेपासून राज्यव्यापी बेमुदत संपाची घोषणा केली आहे. मेडिकल व मेयोच्या मार्डच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी संपाचे पत्र अधिष्ठात्यांकडे सुपूर्द केले आहे.
डेंग्यूच्या उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल झालेल्या एका मुलीची अवस्था फारच नाजूक होऊन तिचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या मुलीच्या नातेवाईकांनी तेथील निवासी डॉक्टरांना मारहाण केली. या घटनेच्या विरोधात केईएममधील डॉक्टर संपावर गेले. चारही आरोपींना त्वरित अटक करून गुन्हे दाखल करा व ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे लावा, अशी मागणी केली. शनिवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ३१ आॅक्टोबरपर्यंत ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे लावण्याचे आश्वासन दिले. परंतु, अटकेबाबत नरमाईची भूमिका घेतल्याने ‘सेंट्रल मार्ड’ने हा संप राज्यभर करण्याचा निर्णय घेतला. निवासी डॉक्टर संपावर जाणार असल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.(प्रतिनिधी)
संपात ६०० वर डॉक्टरांचा सहभाग
सर्वत्र डेंग्यू, मलेरिया व स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत असताना मेडिकलचे सुमारे ४५० तर मेयोचे २०० निवासी डॉक्टर संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे या दोन्ही रुग्णालयाची स्थिती वाईट होण्याची शक्यता आहे. शस्त्रक्रियासुद्धा पुढे ढकलल्या जाणार असल्याचे बोलले जात आहे. शनिवारी मार्डच्या सर्व डॉक्टरांनी काळ्या फिती लावून काम केले.
मागणी पूर्ण झाल्यावरच संप मागे
चारही आरोपींना त्वरित अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही, रुग्णालयात सुरक्षा रक्षक व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविली जाणार नाही, तोपर्यंत हा संप सुरू राहणार आहे.
-डॉ. आयुध मकदुम, सचिव, सेंट्रल मार्ड