वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय झाले ६२
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 10:18 PM2019-07-01T22:18:54+5:302019-07-01T22:20:27+5:30
सार्वजनिक आरोग्य विभागाने रिक्त पदे व त्याचा रुग्णसेवेवर होणारा परिणाम विचारात घेऊन रुग्णसेवेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६२ करण्याचा निर्णय घेतला. यामुळे राज्यात सुमारे १०-१२ हजार डॉक्टरांना याचा फायदा होणार आहे. या निर्णयातून मात्र प्रशासनिक सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांना वगळण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सार्वजनिक आरोग्य विभागाने रिक्त पदे व त्याचा रुग्णसेवेवर होणारा परिणाम विचारात घेऊन रुग्णसेवेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६२ करण्याचा निर्णय घेतला. यामुळे राज्यात सुमारे १०-१२ हजार डॉक्टरांना याचा फायदा होणार आहे. या निर्णयातून मात्र प्रशासनिक सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांना वगळण्यात आले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखाली येणारे संचालक, अतिरिक्त संचालक, सहसंचालक, उपसंचालक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय आणि राज्य कामगार विमा योजना कार्यालयातील संचालक (वैद्यकीय), वैद्यकीय अधीक्षक यांचा समावेश प्रशासानिक सेवेमध्ये करण्यात आला आहे. त्यांचे वय ५८ वरून ६० करण्यात आले. हा निर्णय ३१ मे २०२३ पर्यंत कायम असणार आहे. परंतु या पदावरील अधिकारी वगळता जे वैद्यकीय अधिकारी थेट रुग्णसेवेशी निगडित आहेत त्याच अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६२ करण्यात आले. परंतु याची मुदत दोन वर्षांसाठी, म्हणजे, ३१ मे २०२१ पर्यंतच देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ३१ मे २०१९ पासून हा निर्णय लागू केल्याने याचा फायदा सेवानिवृत्त झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही होणार आहे. जोपर्यंत वैद्यकीय अधिकारी रुग्णसेवेत कार्यरत असेल, तोपर्यंतच वयोमर्यादा वाढ लागू राहिल, हा नियमही आखून दिला आहे.
पदोन्नतीचा मार्ग मोकळा
सेवानिवृत्तीचे वय ६२ पर्यंत वाढविण्याच्या निर्णयातून प्रशासनिक पदावर कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना वगळण्यात आल्याने रुग्णसेवेत असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने (मॅग्मो) या संदर्भात वेळोवेळी निवेदनातून लक्षही वेधले होते.
डॉ. प्रमोद रक्षमवार
सरचिटणीस, मॅग्मो