मेडिकल : औषधांच्या प्रभावाचे निदान करणारे यंत्रच बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 12:00 AM2021-06-05T00:00:33+5:302021-06-05T00:03:04+5:30
Government Medical College हजारो गरीब रुग्णांना चांगले उपचार मिळावे, त्यांच्या आजाराचे निदान तात्काळ व अचूक होण्यासाठी मेडिकलमध्ये अद्ययावत यंत्राची खरेदी केली जाते; परंतु संबंधित कंपनीकडून देखभाल दुरुस्तीचे कंत्राट संपताच नंतर दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी उपलब्धच होत नसल्याने यंत्र कायमची बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हजारो गरीब रुग्णांना चांगले उपचार मिळावे, त्यांच्या आजाराचे निदान तात्काळ व अचूक होण्यासाठी मेडिकलमध्ये अद्ययावत यंत्राची खरेदी केली जाते; परंतु संबंधित कंपनीकडून देखभाल दुरुस्तीचे कंत्राट संपताच नंतर दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी उपलब्धच होत नसल्याने यंत्र कायमची बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. मेडिकलमध्ये २०१३ मध्ये दोन कोटी खर्चून घेण्यात आलेल्या ‘एलसीएमएस’ यंत्राबाबतही असेच झाले आहे. परिणामी, रुग्णांना पदरमोड करून खासगी लॅबमधून चाचणी करण्याची वेळ आली आहे.
आधुनिकतेची कास धरतानाच रुग्णांना आधुनिक यंत्रणेद्वारे तत्पर वैद्यकीय सेवा पुरविण्याच्या दृष्टीने रुग्णालय प्रशासन नवनवीन व अद्ययावत उपकरण खरेदी करण्यासाठी नेहमीच उत्सुक असते. मात्र जेव्हा ही उपकरणे, यंत्र नादुरुस्त होतात तेव्हा त्यांच्या दुरुस्तीच्या खर्चासाठी हात आखडता घेते. अनेक वेळा त्याएवेजी नवे यंत्र खरेदी करण्याचा प्रयत्न असतो. जरी यामागे आर्थिक राजकारण असले तरी नवे यंत्र येईपर्यंत दीड ते दोन वर्षांचा कालावधी जात असल्याने याचा फटका शासकीय रुग्णालयातील गरीब व सामान्य रुग्णांना बसतो. मेडिकलमध्ये अनेक महत्त्वाची यंत्र दुरुस्तीच्या अभावाने बंद पडली आहेत. यातील एक औषधनिर्माणशास्त्र विभागातील (फार्माकोलॉजी) ‘लिक्विड क्रोमॅटोग्राफी- मास स्पेक्ट्रोमेट्री’ हे (एलसीएमएस) एक यंत्र आहे. २०१३ मध्ये दोन कोटी रुपये खर्चून हे यंत्र उपलब्ध करून देण्यात आहे; परंतु याचा रुग्णांना हवा तसा फायदा झाला नाही. सूत्रानुसार, दोन ते तीन हजारांवर चाचण्या झाल्या असताना यंत्र बंद पडले. याच दरम्यान यंत्राला पाच वर्षे पूर्ण झाल्याने संबंधित कंपनीकडून दुरुस्तीचे कंत्राटही संपले. नवे कंत्राटचा प्रस्ताव प्रस्तावित असताना कोरोनाचा प्रादुर्भावाला सुरुवात झाली. यामुळे मागील दीड वर्षांपासून हे यंत्र बंद पडले आहे.
औषधांचा प्रभाव पाहून डोस कमी- जास्त करणे शक्य
मनोरुग्ण, हृदयविकाराचे रुग्ण व लांब औषधोपचार चालणाऱ्या रुग्णांमध्ये औषधांचा प्रभाव पाहण्यासाठी ‘एलसीएमएस’ यंत्र महत्त्वाचे ठरते. रुग्णाचा रक्ताचा नमुना घेऊन ही चाचणी केली जाते. चाचणीचया अहवालावरून औषधांचा कमी- जास्त डोस केला जातो. यामुळे रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते. सोबतच इतरही साइड इफेक्ट टाळता येतात. विशेष म्हणजे, पहिल्या चार दिवसांच्या बाळाला भविष्यात काय आजार होऊ शकतात, याची माहितीसुद्धा हे यंत्र उपलब्ध करून देते. एवढे महत्त्वाचे व महागडे यंत्र मात्र दुरुस्तीअभावी मागील दीड वर्षापासून धूळखात पडले आहे.