मेडिकल नेत्ररोग विभाग : ५०० युवक-युवतींचा सुटला चष्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 10:40 PM2019-08-01T22:40:45+5:302019-08-01T22:43:12+5:30
जाड भिंगाच्या चष्म्यामुळे त्यांच्या करिअरमध्ये अडथळा येत होता.यावर उपाय म्हणून गेल्या पाच महिन्यात ५०० युवक-युवतींनी थेट मेडिकलचा नेत्ररोग विभाग गाठून लॅसिक लेझर शस्त्रक्रिया करून घेतली आणि चष्म्याला कायमचा निरोप दिला. यात तरुणींची संख्या सर्वाधिक होती. या शस्त्रक्रियेच्या मदतीने पावणेदोन ते ‘१०.३०’ पर्यंत असलेले चष्म्याचे नंबर काढण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर:जाड भिंगाच्या चष्म्यामुळे त्यांच्या करिअरमध्ये अडथळा येत होता.यावर उपाय म्हणून गेल्या पाच महिन्यात ५०० युवक-युवतींनी थेट मेडिकलचा नेत्ररोग विभाग गाठून लॅसिक लेझर शस्त्रक्रिया करून घेतली आणि चष्म्याला कायमचा निरोप दिला. यात तरुणींची संख्या सर्वाधिक होती. या शस्त्रक्रियेच्या मदतीने पावणेदोन ते ‘१०.३०’ पर्यंत असलेले चष्म्याचे नंबर काढण्यात आले.
लहानांपासून ते वयोवृद्धांना दूरचे किंवा जवळचे नीट दिसत नसेल, मोतियाबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतरही अंधूक दिसत असेल, जाड चष्म्याच्या भिंगामुळे लग्न जुळत नसेल किंवा नोकरीत अडचण जात असेल अशा सर्वांवर अत्याधुनिक ‘लॅसिक लेझर’उपकरण महत्त्वाचे ठरते. राज्यात हे उपकरण मुंबईच्या जे.जे. रुग्णालयानंतर नागपूरच्या मेडिकलमध्ये उपलब्ध आहे. चार कोटींच्या या उपकरणावर पहिली शस्त्रक्रिया २५ वर्षीय युवकावर यशस्वी पार पडली आणि नंतर युवक-युवतींची संख्या वाढत जाऊन ५०० वर पोहचली. या सर्वांवर लॅसिक लेझरची यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांचे जीवन सुसह्य करण्यास मदत झाली.
विना चिरा, वेदनारहित शस्त्रक्रिया
नेत्ररोग विभागाचे प्रमूख डॉ. अशोक मदान यांनी सांगितले,‘लॅसिक लेझर’ या उपकरणाला ‘लेझर इन सीतू केरॅटोमीलेयुसीस’ असेही म्हटले जाते. डोळ्याच्या बुबुळाच्या मध्य भागातील जाडी साधारण ‘.५’ मिलीमीटर वाढलेली असल्यास त्यात एक नंबर कमी करण्यासाठी १०-१२ मायक्रॉनपर्यंत ही जाडी कमी केल्या जाते. ही सर्व प्रक्रिया ‘लेझर’द्वारे होते. या शस्त्रक्रियेत रुग्णाला इंजेक्शन दिले जात नाही किंवा चिराही लावला जात नाही. वेदनारहित ही १०० टक्के यशस्वी शस्त्रक्रिया आहे.
जाड भिंगाच्या चष्म्यातून मिळाली मुक्ती
डॉ. मदान यांनी सांगितले, एका २५ वर्षीय युवकाला लहानपणापासून नंबरचा चष्मा लागला होता. तो वाढत जाऊन एका डोळ्याचा नंबर तीन तर दुसऱ्या डोळ्याचा नंबर साडेतीन पर्यंत पोहचला. त्याला चष्मा लावूनच सर्व कामे करावी लागायची. यामुळे अनेक समस्येला त्याला सामोरे जावे लागायचे. नुकतीच या युवकावर ‘लॅसिक लेझर’ उपकरणाच्या मदतीने शस्त्रक्रिया करण्यात आली. जाड चष्मा घालून आलेला हा युवक शस्त्रक्रियेनंतर विना चष्म्याने घरी गेला. केवळ अर्ध्या तासात ही यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. अशी अनेक उदाहरणे आहेत.
शस्त्रक्रियेत तरुणींची संख्या सर्वाधिक
मेडिकलच्या नेत्ररोग विभागात आतापर्यंत १९ ते ३७ वयोगटातील ५०० तरुण-तरुणींच्या डोळ्यावर ‘लॅसिक लेझर’ शस्त्रक्रिया करण्यात आली. यात साधारण ६० टक्के तरुणींचा समावेश होता. त्यांच्या करिअरमध्ये चष्म्याची अडचण येत असल्याने त्यांनी ही शस्त्रक्रिया केली. हे सर्वच जण दोन ते तीन दिवसात आपापल्या कामावरही परतले.
डॉ. अशोक मदान
विभागप्रमुख, नेत्ररोग मेडिकल