मेडिकलच्या रुग्णांना आता हवेतील ऑक्सिजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:11 AM2021-08-22T04:11:22+5:302021-08-22T04:11:22+5:30
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा पडल्याने इतर राज्यातून ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची वेळ आली. संभाव्य तिसऱ्या लाटेत दर ...
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा पडल्याने इतर राज्यातून ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची वेळ आली. संभाव्य तिसऱ्या लाटेत दर दिवसाला ४०० मेट्रिक टन ऑक्सिजन लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर हवेतून प्राणवायू शोषून घेणारे (पीएसए) यंत्र मेडिकलमध्ये उभारले जात आहे. लवकरच याचा लाभ जवळपास ६०० वर रुग्णांना मिळणार आहे.
कोरोनाची दुसरी लाट भयावह ठरली. ९५ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडली. एका रुग्णाला दर मिनिटाला कमीतकमी १० तर जास्तीत जास्त ७० लिटरपर्यंत ऑक्सिजन लागत होते. १७८ मेट्रिक टनापर्यंत ऑक्सिजनची मागणी वाढली होती. इतर राज्यातून ऑक्सिजन आणण्यासाठी रेल्वे व विमानाची सेवा घ्यावी लागली. परंतु रुग्णसंख्येचा उच्चांक महिनाभरातच कमी झाल्याने मोठा धोका टळला. पुन्हा अशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून हवेतून ऑक्सिजन शोषून घेऊन म्हणजे ‘प्रेशर स्विंग ॲडॉर्सप्शन’ (पीएसए) लावण्याचा सरकारने निर्णय घेतला असून, त्याच्या उभारणीला सुरुवात झाली आहे.
-मेडिकलमध्ये ‘पीएसए’चे तीन प्लांट
एम्स, मेयोमध्ये प्रत्येकी ३ तर मेडिकलमध्ये ३ असे ९ ‘पीएसए’ प्लांट स्थापन केले जाणार आहेत. याची सुरुवात मेडिकलमधून झाली. मेडिकलमध्ये यातील एक ‘२०० एनएम ३’चा प्लांट उभारला जात आहे. याची क्षमता ३२०० लिटर प्रति मिनिट ऑक्सिजनची असणार आहे. असाच एक प्लांट लवकरच स्थापन केला जाणार आहे. १६०० लिटर प्रति मिनिट ऑक्सिजनची क्षमता असलेला ‘१२० एनएम ३’चा प्लांटही लवकरच उभारला जाणार आहे.
-एचडीयू व वॉर्डातील रुग्णांना देणार ऑक्सिजन ()
‘पीएसए’मधून मिळणारे ऑक्सिजन हे ‘एचडीयू’ व वॉर्डातील रुग्णांना दिले जाणार आहे. ‘आयसीयू’मधील रुग्णांना ‘लिक्वीड ऑक्सिजन’दिले जाईल. या प्लांटसाठी पालकमंत्री नितीन राऊत व जिल्हाधिकारी विमला आर. यांनी पुढाकार घेतला.
- डॉ. सुधीर गुप्ता, अधिष्ठाता मेडिकल