मेडिकलमधील रुग्ण भिजले : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 11:22 PM2019-07-30T23:22:04+5:302019-07-30T23:26:05+5:30

गेल्या वर्षी मुसळधार पावसामुळे मेडिकलच्या अपघात विभागापासून, तळमजल्यावरील वॉर्डात व शस्त्रक्रिया गृहात पाणी शिरले होते. रुग्णांना ऐनवेळी दुसऱ्या वॉर्डात स्थानांतरित करावे लागले. परंतु त्यानंतरही बांधकाम विभागाने विशेष उपाययोजना केली नाही. परिणामी, या वर्षी पुन्हा रुग्णांना पावसाच्या पाण्यात भिजावे लागले. वॉर्ड १७, १८, ३५ व ईएनटीमधील छताला गळती लागल्याने ऐनवेळी तारांबळ उडाली. वॉर्डात पाणी साचल्याने रुग्णसेवेत अडचणी आल्या.

Medical Patients Soaked: Public Works Department's Neglect | मेडिकलमधील रुग्ण भिजले : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

मेडिकलमधील वॉर्डाचा छताला गळती लागल्याने तेथील रुग्णांना हलवून त्या ठिकाणी कुलरच्या टाक्या, बादल्या ठेवण्यात आल्या. वॉर्ड क्र. १८चे छत दर पावसाळ्यात गळत असल्याने भिंतीला असे शेवाळ लागले आहे.

googlenewsNext
ठळक मुद्देवॉर्ड १७, १८, ३५ , ईएनटी विभागाला लागली गळती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या वर्षी मुसळधार पावसामुळे मेडिकलच्या अपघात विभागापासून, तळमजल्यावरील वॉर्डात व शस्त्रक्रिया गृहात पाणी शिरले होते. रुग्णांना ऐनवेळी दुसऱ्या वॉर्डात स्थानांतरित करावे लागले. परंतु त्यानंतरही बांधकाम विभागाने विशेष उपाययोजना केली नाही. परिणामी, या वर्षी पुन्हा रुग्णांना पावसाच्या पाण्यात भिजावे लागले. वॉर्ड १७, १८, ३५ व ईएनटीमधील छताला गळती लागल्याने ऐनवेळी तारांबळ उडाली. वॉर्डात पाणी साचल्याने रुग्णसेवेत अडचणी आल्या. 


सलग पाच-सहा तास मुसळधार पाऊस झाल्यास मेडिकलमध्ये पावसाचे पाणी शिरते. अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. गेल्या वर्षी शल्यक्रिया विभागाच्या आकस्मिक विभागात गुडघाभर पाणी शिरल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली. मात्र सफाई कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून पाणी उपासण्याचे काम केल्याने दुपारनंतर रुग्णसेवा सुरळीत झाली. या संदर्भातील तक्रारी झाल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर बांधकाम विभागाने मोठ्या व्यासाची पाईप लाईन टाकली. यामुळे सध्यातरी पावसाचे पाणी शिरले नाही. परंतु छताला गळती लागल्याने वॉर्डात पाणी साचून रुग्ण भिजले. याचा सर्वाधिक फटका शल्यक्रियाचा वॉर्ड क्र. १७, १८, मेडिसीनचा वॉर्ड क्र. ३५ व कान, नाक व घसा (ईएनटी) विभागाचा बाह्यरुग्ण विभागाला बसला. वॉर्डातील काही रुग्णाला दुसऱ्या ठिकाणी हलवावे लागले. सफाई कर्मचाऱ्यांनी तात्पुरती सोय म्हणून कुठे कुलरची टाकी, तर कुठे बादली ठेवली. विशेष म्हणजे, मेडिकलच्या बांधकाम विभागाला इमारतीच्या देखभालीसाठी मोठा निधी मिळतो, परंतु त्यांचे याकडे लक्ष नसल्याने रुग्णालय प्रशासनासह खुद्द रुग्णांना गैरसोयींना तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र आहे. गळतीला घेऊन अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी तातडीने बांधकाम विभागाला डागडुजी करण्याचा सूचना दिल्याचे समजते.
औषध भांडारातही शिरले पाणी
सोमवारपासून सुरू झालेला संतधार पाऊस मंगळवारी कायम होता. परिणामी, नेहमीप्रमाणे या वर्षीही मेडिकलच्या औषध भांडारात पावसाचे पाणी शिरले. पाणी काढण्याकरिता येथे मोटार पंपाची व्यवस्था आहे. परंतु त्याचा हवा तसा फायदा होत नसल्याचे कर्मचारीच सांगतात. यातच भांडाराचा भिंतीला ओलावा येत असल्याने याचा प्रभाव औषधांवरही पडत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, जमिनीखाली असलेल्या या भांडारासाठी ९ कोटी २१ लाख खर्चून नवीन इमारत बांधण्यात आली. २०१४ पासून बांधकाम सुरू झाले. परंतु पाच वर्षांचा कालावधी होऊन अद्यापही बांधकाम विभागाने ही इमारत मेडिकल प्रशासनाकडे हस्तांतरित केली नसल्याचे सांगण्यात येते. सूत्रानूसार, इमारतीच्या आतील बांधकामात रुग्णालय प्रशासनाने काही बदल सुचविल्याने कामात विलंब होत असल्याचे बोलले जात आहे.

 

Web Title: Medical Patients Soaked: Public Works Department's Neglect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.