नागपुरात मेडिकल रुग्णांना मिळणार १० रुपयात जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 09:57 PM2017-11-18T21:57:24+5:302017-11-18T22:05:31+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) विदर्भच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यातून रुग्ण येतात. येथे येणारे रुग्ण बहुसंख्य गरीब असतात. या रुग्णांसोबतच त्यांची सुश्रुषा करण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांना दोन वेळचे जेवण उपलब्ध व्हावे या उद्देशाने ज्येष्ठ नगरसेवक संदीप जोशी यांच्या पुढाकारातून व संकल्पनेतून युवा झेप प्रतिष्ठानतर्फे १० रुपयांत जेवण उपलब्ध करून दिले जाणार आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) विदर्भच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यातून रुग्ण येतात. येथे येणारे रुग्ण बहुसंख्य गरीब असतात. या रुग्णांसोबतच त्यांची सुश्रुषा करण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांना दोन वेळचे जेवण उपलब्ध व्हावे या उद्देशाने ज्येष्ठ नगरसेवक संदीप जोशी यांच्या पुढाकारातून व संकल्पनेतून युवा झेप प्रतिष्ठानतर्फे १० रुपयांत जेवण उपलब्ध करून दिले जाणार आहे.
गरीब रुग्णांसाठी मेडिकल हे आशेचे किरण आहे. रुग्णातील सोयी, अद्ययावत तंत्रज्ञानामुळे या रुग्णालयावर रुग्णांचा विश्वास वाढत आहे. परिणामी, दोन हजार रुग्णांची ‘ओपीडी’ तीन हजारांवर गेली आहे. आंतररुग्ण विभागातही रुग्णांची संख्या वाढली आहे. गरीब रुग्णांच्या नाश्त्यासह दोन वेळच्या जेवणाची सोय शासनाकडून केली जाते. मात्र, रुग्णांसोबत येणाºया नातेवाईकांसाठी जेवणाची व्यवस्था राहत नाही. अनेक रुग्ण दोन दिवसांपासून ते महिनाभर उपचारासाठी असतात. अशावेळी नातेवाईक अडचणीत येतात. काही सामाजिक संस्था यांच्यासाठी नि:शुल्क जेवण पुरवितात. परंतु नातेवाईकांची संख्या पाहता यालाही मर्यादा पडतात. दररोजच्या जेवणाचा त्यांच्यासमोर प्रश्न असतो. यामुळे काही जण मेडिकल परिसरातच चूल पेटवून स्वयंपाक करतात. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा जेवण्याचा प्रश्न काही प्रमाणात मिटावा म्हणून संदीप जोशी यांनी युवा झेप प्रतिष्ठानच्या पुढाकाराने ‘पं. दीनदयाल थाळी’ नावाने मेडिकल परिसरात प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पाचे भूमिपूजन रविवार १९ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता खा. अजय संचेती यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आ. सुधाकर कोहळे, आ. ना. गो. गाणार, रमेश मंत्री, अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे उपस्थित राहतील.
रोज १००० लोकांच्या जेवणाची व्यवस्था
मेडिकलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हा प्रकल्प सुरू होणार आहे. येथे रोज दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत एक हजार गरजू रुग्णांच्या नातेवाईकांकरिता अवघ्या १० रुपयांमध्ये जेवणाची थाळी उपलब्ध होईल. या थाळीत तीन पोळ्या, भाजी व भात राहील. युवा झेप प्रतिष्ठानने यापूर्वी धंतोली व रामदासपेठ भागातही ‘दीनदयाल लंच बॉक्स’ उपलब्ध करून दिला आहे.
कोणीही उपाशी राहू नये
गरीब व गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना १० रुपयांत जेवण देण्याचा प्रकल्प प्रायोगिकस्तरावर धंतोली येथे सुरू केला. परंतु या प्रकल्पाचा खरा उपयोग मेडिकलमध्ये मोठ्या संख्येत येणाऱ्या गरिबांसाठी व्हावा असे विचार नागपुरातील सहृदय लोकांनी मांडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याविषयी सांगितले असता त्यांनी तत्काळ मेडिकलच्या परिसरात जागा उपलब्ध करून दिली. या प्रकल्पामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या जेवणाचा प्रश्न मिटणार आहे. कुणी उपाशी राहू नये हीच या प्रकल्पामागची भूमिका आहे.
संदीप जोशी
ज्येष्ठ नगरसेवक