मेडिकल : वाढणार पीजीच्या १२८ जागा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 01:28 AM2019-04-24T01:28:35+5:302019-04-24T01:29:19+5:30
मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या जागा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एमसीआय’च्या नव्या निकषानुसार शिक्षकांचा अनुभव, युनिटची संख्या व खाटेनुसार नागपूर मेडिकलमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) १२५ तर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील तीन जागा अशा एकूण १२८ जागा वाढण्याची शक्यता आहे. मेडिकल प्रशासनाकडून या संदर्भातील प्रस्ताव बुधवारी वैद्यकीय शिक्षण विभागाला पाठविला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या जागा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एमसीआय’च्या नव्या निकषानुसार शिक्षकांचा अनुभव, युनिटची संख्या व खाटेनुसार नागपूर मेडिकलमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) १२५ तर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील तीन जागा अशा एकूण १२८ जागा वाढण्याची शक्यता आहे. मेडिकल प्रशासनाकडून या संदर्भातील प्रस्ताव बुधवारी वैद्यकीय शिक्षण विभागाला पाठविला जाणार आहे.
पूर्वी ‘एमसीआय’च्या निकषानुसार प्राध्यापकाला तीन, सहयोगी प्राध्यापकाला दोन तर सहायक प्राध्यापकाला एक ‘पीजी’ विद्यार्थी मिळायचा. आता ज्या सहयोगी प्राध्यापकाला तीन वर्षे पूर्ण झाली असतील व या काळात शोधनिबंध सादर केले असतील तर त्यालाही तीन जागा मिळणार आहेत. या शिवाय, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक असलेल्या एका ‘युनिट’कडे ४० खाटांचा वॉर्ड असेल तर अशा युनिटला पाच पीजीचे विद्यार्थी मिळतील. या शिवाय, ज्या युनिटमध्ये प्राध्यापक नाही, परंतु सहयोगी प्राध्यापकाला तीन वर्षांचा अनुभव आहे आणि दोन सहायक प्राध्यापक आहेत अशा युनिटलाही पाच पीजीचे विद्यार्थी देण्याचा निर्णय ‘एमसीआय’ने घेतला आहे. या संदर्भातील एक पत्र ४ एप्रिल रोजी सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना प्राप्त झाले आहे. त्यानुसार ‘एमसीआय’ने वाढीव पीजीच्या जागांचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागपूर मेडिकल बधिरीकरण विभागाच्या वाढीव नऊ, बालरोग विभागाच्या वाढीव पाच, रेडिओलॉजी विभागाच्या वाढीव १६, नेत्ररोग विभागाच्या वाढीव तीन, औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या वाढीव सहा, स्त्री रोग व प्रसूती विभागाच्या वाढीव सहा, जनरल शल्यक्रिया विभागाच्या वाढीव १३, अस्थिरोग विभागाच्या वाढीव नऊ, विकृतीशास्त्र विभागाच्या वाढीव १४, मायक्रोबायलॉजी विभागाच्या वाढीव ३०, औषधनिर्माणशास्त्र विभागाच्या वाढीव चार, कम्युनिटी मेडिसीन विभागाच्या वाढीव आठ व कान, नाक व घसारोग विभागाच्या वाढीव दोन अशा एकूण १२५ तर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील गॅस्ट्रोएन्ट्रालॉजी विभागाच्या वाढीव एक, कार्डिओलॉजी विभागाच्या वाढीव दोन अशा एकूण १२८ जागांचा प्रस्ताव सादर करणार आहे. ‘एमसीआय’च्या निकषानुसारच या वाढीव जागा पाठविण्यात येत असल्याने एवढ्या जागा वाढतीलच अशी, अपेक्षाही केली जात आहे.
सध्या मेडिकलमध्ये विविध विषयांच्या मिळून पीजीच्या १७५ जागा आहेत. यात १२८ची भर पडल्यास ३०३ जागा होण्याची शक्यता आहे. याचा फायदा विदर्भातील विद्यार्थ्यांना होईल. सर्वाधिक पीजीच्या ३५ जागा ‘जनरल सर्जरी’ विभागाकडे असणार आहे.
पाच विभागाने नाकारल्या वाढीव जागा
विद्यार्थी मिळत नसल्याने ‘फिजीओलॉजी’, ‘बायोकेमेस्ट्री’, ‘स्कीन’, ‘अॅनाटॉमी’ व ‘फॉरेन्सिक’ विभागाने वाढीव जागा नाकारल्या आहेत. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी संबंधित विभागाकडून तसे पत्र लिहून देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
वाढीव पीजी जागांची गरज
एमबीबीएस विद्यार्थ्यांच्या तुलनेत आजही पीजीच्या जागा फार कमी आहेत. पीजीच्या जागा वाढल्यास विशेषज्ञ डॉक्टरांची संख्या वाढेल. यामुळे शासकीय महाविद्यालयांसाठी ही एक संधी आहे. मेडिकलने वाढीव १२८ पीजी जागांचा प्रस्ताव तयार केला आहे.
डॉ. सजल मित्रा
अधिष्ठाता, मेडिकल