मेडिकलचे व्हावे पोस्टमार्टम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:07 AM2021-07-09T04:07:39+5:302021-07-09T04:07:39+5:30
तसे तर मेडिकलमध्ये पावसाचे पाणी शिरण्याची ही पहिलीच घटना नाही. पावसाचा जोर वाढला की डॉक्टर आणि रुग्णांच्या छातीत धडधड ...
तसे तर मेडिकलमध्ये पावसाचे पाणी शिरण्याची ही पहिलीच घटना नाही. पावसाचा जोर वाढला की डॉक्टर आणि रुग्णांच्या छातीत धडधड वाढते. रुग्ण तर काही दिवसासाठी येत असतात मात्र मेडिकलमधील डॉक्टरांना तर वास्तवाची जाण आहे. नित्यनेमाने आंदोलने होतात, मागण्यांसाठी संपदेखील होतात. मात्र रुग्णालयात डागडुजी करण्यासाठी प्रशासनाला कुंभकर्णी झोपेतून उठवावे यासाठी आंदोलन झाल्याचे ऐकिवात नाही. नेमेचि येतो पावसाळा प्रमाणे नेमेचि येते मेडिकलमध्ये पाणी याची डॉक्टर, अधिकारी व प्रशासन यांना सवय झाली आहे.
कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असल्याने ठीक, परंतु जर कोरोना रुग्ण भरती असताना असा प्रकार घडला असता तर त्याची जबाबदारी कुणी घेतली असती या प्रश्नाचे मेडिकलमध्ये कुणीही उत्तर देणार नाही. आरोग्यसेवेसंदर्भात आपल्याकडे अद्यापही फारसे आश्वासक चित्र नाही. केंद्रीय व राज्यपातळीवरून निधी मिळत असला तरी मूलभूत समस्या दूर करण्यासाठी फारसा पुढाकार घेण्यात येत नाही. मेडिकलच्या काही वॉर्डांमध्ये तर आत शिरण्याचीदेखील इच्छा होत नाही. वॉर्डाबाहेरील मोकळ्या जागा कधी कचराघर झाले याचा शोध कधी प्रशासनातील अधिकारी व डॉक्टर घेत नाही. सरकारी व्यवस्थेचा दृष्टिकोन किती संकुचित आहे याचे अशा घटना उदाहरणच म्हणावे लागेल. डॉक्टर व अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोर ही अव्यवस्था विक्राळ रूप धारण करत असते. मात्र व्यवस्थेतील चटके जाणवल्या नंतरदेखील अनेक जण ‘कशाला हवी ती कटकट’ असा विचार करत सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करत असतात. खऱ्या अर्थाने मेडिकलचे पोस्टमार्टम करणे गरजेचे आहे. प्रसारमाध्यमे आरसा दाखविण्याचे काम तर करतच राहणार. मात्र प्रत्यक्ष दुरुस्तीसाठी पुढाकार घेणार कोण या मुद्द्यावर चिंतन आवश्यक आहे.