दररोज ३० बेड वाढविण्याची ‘मेडिकल’ची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:06 AM2021-03-29T04:06:57+5:302021-03-29T04:06:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाबाधितांची संख्या दररोज वाढत असून, शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये ‘बेड्स’ कमी पडत आहेत. ‘मेडिकल’मध्ये ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाधितांची संख्या दररोज वाढत असून, शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये ‘बेड्स’ कमी पडत आहेत. ‘मेडिकल’मध्ये सोमवारपासून दर दिवसाला ३० ‘बेड’ वाढविण्याची तयारी रुग्णालय प्रशासनाने दाखविली आहे. त्यामुळे काही प्रमाणात रुग्णांना दिलासा मिळू शकतो. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी कोरोनासंदर्भात आढावा बैठक घेतली. त्यात ‘मेडिकल’ प्रशासनाकडून ही भूमिका मांडण्यात आली.
बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, महापालिकेचे अपर आयुक्त जलज शर्मा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अजय केवलिया, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या दोन ठिकाणी बेडच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिष्ठातांसोबत चर्चा करत वैद्यकीय महाविद्यालयातील बेडची संख्या एक हजारापर्यंत वाढविण्याचे आवाहन केले. तसेच ‘मेडिकल’मधील सर्व नॉन कोविड वाॅर्ड कोविड वाॅर्डात रूपांतरित करण्याचेही त्यांनी सुचविले. न्यायालयाच्या निर्देशानुसार मेडिकल बेसमेंटमध्येदेखील उपाययोजना करण्याबाबत त्यांनी सांगितले. खासगी हॉस्पिटलमधील बेडची संख्या युद्धस्तरावर वाढविण्यात यावी. तसेच शहराला ऑक्सिजनचा पुरवठा सुव्यवस्थित करण्यात यावा, असे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले.
शहरात ३५, तर ग्रामीणमध्ये ५५ टक्के लसीकरण
नागपूर ग्रामीण भागामध्ये ५५ टक्के लसीकरण झाले असून, शहरी भागांमध्ये जवळपास ३५ टक्के लसीकरण झाले आहे. ग्रामीण भागातील लसीकरणाला गती देण्यासाठी राजकीय, सामाजिक व वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याबाबत त्यांनी सूचना केली.
नियम तोडणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई करावी
गृह अलगीकरणात असणारे बाधित घराबाहेर पडणार नाही यासाठी पोलिसांनी कडक कारवाई करावी तसेच सुपर स्प्रेडर्सविरोधातदेखील कारवाईचा वेग वाढवावा, असे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले.
पालकमंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा
पालकमंत्री नितीन राऊत हे तामिळनाडू व पुड्डुचेरी येथील निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे गृहमंत्र्यांनी बैठकीदरम्यान त्यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. नागपूर शहर व जिल्ह्यामधील कोरोना काळातील बंदीसंदर्भातील पुढील निर्णय ३० मार्चनंतर घेतला जाईल, असे यावेळी गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.