अमृत महोत्सवासाठी मेडिकल सज्ज; राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन
By सुमेध वाघमार | Published: November 25, 2023 08:08 PM2023-11-25T20:08:06+5:302023-11-25T20:08:21+5:30
या महोत्सवाचे उद्घाटन १ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे.
नागपूर: मध्य भारतातील सर्वात मोठे रुग्णालय असलेले नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) हे अमृत महोत्सवासाठी सज्ज झाले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन १ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला देश-विदेशातील मिळून जवळपास तीन हजार विद्यार्थी उपस्थित राहतील, अशी माहिती मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी दिली.
शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत डॉ. गजभिये बोलत होते. यावेळी उपअधिष्ठाता डॉ. देवेंद्र माहुरे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अविनाश गावंडे, डॉ. उदय नारलावार, डॉ. अर्चना देशपांडे, डॉ. रुजिता फुके, डॉ. मुरली, डॉ. वाईकर आदी उपस्थित होते. डॉ. गजभिये म्हणाले, या महोत्सवाच्या उद्घाटनाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रपतींच्या हस्ते चार मान्यवरांचा सत्कार
मेडिकलला १९६ एकरची जागा दान करणारे कर्नल डॉ. कुकडे यांचे नातू अॅड. दिनकर कुकडे, मेडिकलमधून उत्तीर्ण होणाºया पहिल्या बॅचचे विद्यार्थी डॉ. बी.जे. सुभेदार, लेक्चर हॉलच्या नुतनीकरणसाठी ५३ लाखांची मदत करणाऱ्या माजी विद्यार्थिनी डॉ. शकुंतला गोखले यांच्या नातेवाईकांचा व सुपर स्पेशालिटीच्या मेंदूरोग विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद गिरी यांच्या सत्कार राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.
डाक तिकीट कव्हरपेजचे अनावरण
डॉ. गजभिये म्हणाले, मेडिकलच्या अमृत महोत्सवाचा विशेष टपाल तिकीटाचे अनावरण राष्टÑपतींच्या हस्ते होणार आहे. मेडिकलच्या दोन नवनिर्मित सभागृहांचे डिजीटल उद्घाटनही त्यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमातच राज्यपालांच्या हस्ते अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचे तसेच कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात येईल.
रुग्णांची गैरसोय होणार नाही
अमृत महोत्सव सोहळ्याचा फटका मेडिकलमधील रुग्णांना बसणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. सोहळ्याला येणाºयांच्या बसण्यापासून ते पार्र्किंगची विशेष सोय करण्यात आली असल्याचेही डॉ. गजभिये म्हणाले.
माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याने महोत्सवाची सांगता
अमृत महोत्सवाच्या उद्घाटनानंतर मेडिकलच्या विविध विभागांमध्ये पुढील १५ दिवस परिसंवाद, कार्यशाळा, चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. महोत्सवाची सांगता २२ व २३ डिसेंबर रोजी देश-विदेशात विविध क्षेत्रात कार्यरत मेडिकलच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याने होणार आहे.
मेडिकलला भेट देणाऱ्या तिसऱ्या राष्ट्रपती
अमृत महोत्सवाच्या निमित्ताने नागपूर मेडिकलला भेट देणाऱ्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या तिसऱ्या राष्ट्रपती ठरणार आहेत. यापूर्वी देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते १९५३ मध्ये ‘मेडिकल’चे लोकार्पण करण्यात आले. १९९५ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकर दयाल शर्मा यांच्या हस्ते मेडिकलच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले.