फुफ्फुसाचा कॅन्सर व लंग फायब्रोसिसच्या रुग्णात वाढ; मेडिकलमध्ये व्हावे ‘लंग ट्रान्सप्लांट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 10:53 AM2021-01-29T10:53:32+5:302021-01-29T10:53:52+5:30
Nagpur News हवेतील प्रदूषण, धूम्रपानाची सवय यामुळे फुफ्फुसाच्या आजारात वाढ झाली आहे. भारतात पूर्वी फुफ्फुसाचा कॅन्सर हा आठव्या स्थानी होता, आता तो चौथ्या स्थानावर आला आहे.
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हवेतील प्रदूषण, धूम्रपानाची सवय यामुळे फुफ्फुसाच्या आजारात वाढ झाली आहे. भारतात पूर्वी फुफ्फुसाचा कॅन्सर हा आठव्या स्थानी होता, आता तो चौथ्या स्थानावर आला आहे. धक्कादायक म्हणजे, ८५ टक्के रुग्ण हे फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात उपचारासाठी येत असल्याने मृत्यूचे प्रमाण मोठे आहे. यातच कोरोनामुळे ‘लंग फायब्रोसिस’चे रुग्ण वाढले आहेत. यातील काहींवर उपचार शक्य नाही. यामुळे लंग ट्रान्सप्लांट म्हणजे फुफ्फुस प्रत्यारोपणाची मागणी वाढली आहे. याचा आधार घेत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) ‘लंग ट्रान्सप्लांट’चा प्रस्ताव तयार केला आहे. याला मंजुरी मिळाल्यास मध्य भारतातील हे पहिले केंद्र ठरेल.
भारतीय कर्करोग संस्थेद्वारे केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात एक लाख लोकसंख्येमागे ९.२ टक्के लोक लंग कॅन्सरने पीडित आहेत. यात पहिल्या स्थानावर मुंबई (१०.३ टक्के), तर दुसऱ्या स्थानावर नागपूर (८.८ टक्के ) आहे. तिसऱ्या स्थानी पुणे (७.८ टक्के) व चौथ्या स्थानी औरंगाबाद (५.९ टक्के) आहे. विशेष म्हणजे, विदर्भात सध्याच्या स्थितीत वीजनिर्मितीचे १४ प्रकल्प आहेत. परिणामी, या भागात श्वसनाच्या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणाची टक्केवारी वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा रुग्णांवर तात्काळ व योग्य पद्धतीचे उपचार करण्यासोबतच संशोधनाचे दार उघडण्यासाठी आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या सूचनेवरून मेडिकलच्या श्वसनरोग विभागाने ‘लंग इन्स्टिट्यूट’चा प्रस्ताव पाठविला होता. यात विविध २३ विभागासह त्याच्या सब-विभागांचा समावेश होता. परंतु याचा पाठपुरावा कुणीच केला नाही. यामुळे हा प्रकल्प मागे पडला. परंतु कोरोनामुळे लंग ट्रान्सप्लांटची मागणी वाढताच अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या मार्गदर्शनात श्वसनरोग विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांनी ‘लंग ट्रान्सप्लांटचा प्रस्ताव तयार केला. लवकरच हा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविला जाणार आहे.
- पहिल्या कोरोनाबाधितावर फुफ्फुस प्रत्यारोपण
पंजाबमधील ३२ वर्षीय युवकाचा कोरोनामुळे गंभीर स्वरूपाचा ‘लंग फायब्रोसिस’ झाल्याने त्याचे फुफ्फुस निकामी झाले होते. कोलकाता येथील एका ‘ब्रेनडेड’ रुग्णाकडून फुफ्फुस मिळाल्याने हैदराबाद येथील कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे त्याच्यावर दोन्ही भागातील फुफ्फुसाचे प्रत्यारोपण करण्यात आले. कोरोनाबाधिताचा ‘लंग ट्रान्सप्लांट’ची पहिल्यांदाच नोंद झाली आहे.
- ७०३ पैकी ९८ रुग्णांना ‘लंग फायब्रोसिस’
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ‘पल्मनरी मेडिसीनच्या पोस्ट कोविड’ विभागात मागील चार महिन्यात कोरोनावर मात केलेले ७०३ रुग्ण उपचारासाठी आले. यातील ९८ रुग्णांना ‘लंग फायब्रोसिस’ असल्याचे निदान झाले. धक्कादायक म्हणजे, यातील १० रुग्णांना अतिगंभीर स्वरूपाचा ‘लंग फायब्रोसिस’ झाला आहे. ते कृत्रिम ऑक्सिजनवर आहेत. त्यांच्याकडे फुफ्फुस प्रत्यारोपण म्हणजे ‘लंग ट्रान्सप्लांट’शिवाय पर्याय नाही.
-फुफ्फुस प्रत्यारोपण केंद्र आवश्यक
प्रदूषण, धूम्रपानाची सवय यामुळे फुफ्फुसाच्या आजारात वाढ होऊन लंग कॅन्सरचे रुग्ण वाढले आहेत. यातच कोरोनामुळे गंभीर स्वरूपातील ‘लंग फायब्रोसिस’च्या रुग्णात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या दोन्ही आजारात फुफ्फुस प्रत्यारोपणशिवाय पर्याय नाही. यामुळे लंग ट्रान्सप्लांटचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. प्रत्यारोपण केंद्र आवश्यक झाले आहे.
- डॉ. सुशांत मेश्राम
श्वसनरोग विभाग, मेडिकल