मेडिकलमध्ये रुग्णांची उपासमार!
By Admin | Published: December 9, 2015 03:28 AM2015-12-09T03:28:38+5:302015-12-09T03:28:38+5:30
अधिवेशन काळात तरी दोन वेळ पोटभर जेवण मिळेल, या आशेवरही पाणी फेरले गेले आहे. कधी एक पोळी
सुमेध वाघमारे नागपूर
अधिवेशन काळात तरी दोन वेळ पोटभर जेवण मिळेल, या आशेवरही पाणी फेरले गेले आहे. कधी एक पोळी तर कधी तीही मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार मध्य भारतातील सर्वात मोठे रुग्णालय मेडिकलमध्ये सुरू आहे. नियमांना बगल देत पोषक आहाराऐवजी केवळ मोजकाच आणि तोही निकृष्ट दर्जाचा आहार दिला जात असल्याने रुग्णांवर उपासमारीची वेळ आली आहे.
आजाराला लवकर आटोक्यात आणण्यासाठी रुग्णाला योग्य उपचारासोबत योग्य आहाराची गरज असते. रुग्णाला पौष्टिक आहार मिळाल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो. रोगप्रतिकारकशक्ती वाढून रुग्ण लवकर बरा होतो. सध्याच्या स्थितीत मेडिकलसह सुपर स्पेशालिटी रुग्णालय व टीबी वॉर्डातील मिळून एकूण सुमारे ८०० रुग्णांना सकाळच्या नाश्तासह दोन वेळेचे जेवण दिले जाते. रुग्णांच्या जेवणात तूर किंवा मसुरीचे वरण, भात, भाजी, पोळी असा मेनू ठरलेला आहे. परंतु तुटपुंज्या कर्मचाऱ्यांमुळे कधी एक पोळी तर कधी तीही मिळत नाही. भाजीच्या नावाखाली लवकी व भोपळ्याची रस्सेदार भाजी दिली जात आहे. वरणाच्या नावाने पिवळे पाणी ताटात ओतले जात आहे. याला पोषक आहार म्हणावा का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात ‘लोकमत’ने वारंवार वृत्त प्रसिद्ध केले आहे. परंतु अद्यापही यात बदल झालेला नाही. हिवाळी अधिवेशनाच्यनिमित्ताने का होईना वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे, सचिव मेधा गाडगीळ नागपुरात तळ ठोकून आहेत. तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे खुद्द मेडिकल परिसरात वास्तवास आहेत. असे असतानाही मेडिकलच्या रुग्णांची दोन वेळच्या जेवणांची भ्रांत कायम आहे.