मेडिकल : झोपेच्या उपचाराच्या अभ्यासाला विद्यार्थीच मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:54 PM2019-03-15T23:54:54+5:302019-03-15T23:56:15+5:30
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ‘रेस्पिरेटरी अॅण्ड स्लीप मेडिसीन’ विभागाच्यावतीने २०१८ मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘फेलोशिप इन स्लीप मेडिसीन’ अभ्यासक्रमाला २०१८मध्ये मंजुरी मिळाली. परंतु गेल्या वर्षी विद्यार्थीच मिळाले नाहीत. यामुळे दोन जागा वाया गेल्या. विशेष म्हणजे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिककडून मान्यताप्राप्त देशातील हा पहिला अभ्यासक्रम आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ‘रेस्पिरेटरी अॅण्ड स्लीप मेडिसीन’ विभागाच्यावतीने २०१८ मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘फेलोशिप इन स्लीप मेडिसीन’ अभ्यासक्रमाला २०१८मध्ये मंजुरी मिळाली. परंतु गेल्या वर्षी विद्यार्थीच मिळाले नाहीत. यामुळे दोन जागा वाया गेल्या. विशेष म्हणजे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिककडून मान्यताप्राप्त देशातील हा पहिला अभ्यासक्रम आहे.
निरोगी मानसिक व शारीरिक आरोग्याकरिता जसे हवा, पाणी व अन्न अत्यंत आवश्यक आहे, तसे झोप अत्यावश्यक आहे. वाढत्या वयामध्ये होण्याऱ्या विकासाच्या प्रक्रियेत झोपेची भूमिका महत्त्वाची असते. अपूर्ण किंवा कमी दर्जाच्या झोपेमुळे शारीरिक व मानसिक व्याधी जडतात़ ‘स्लिप अॅपनिया’ नावाचा आजार जागतिक स्तरावर चार टक्के वयस्क व्यक्तीमध्ये आढळतो़ त्याच प्रमाणे झोपेचा ‘रेस्टलेस लेग सिंड्रोम’ नावाचा आजार १० टक्के लोकांमध्ये आढळतो़ उशिरा झाोपणारे किंवा रात्रपाळीत काम करण्याऱ्या व्यक्तीमध्ये गंभींर स्वरुपाचे आजार होण्याची शक्यता असते. शिवाय, रात्री झोपेत घोरणे हा ‘स्लिप अॅपनिया’ या गंभीर आजाराचे लक्षण आहे. या आजारात श्वसनात अडथळा निर्माण होतो़ झोपेत अचानक श्वास थांबल्यामुळे मेंदूला आॅक्सिजनचा पुरवठा थांबतो व त्यामुळे झोपेच्या ‘सायकलमध्ये’ अडथळा निर्माण होऊन शारीरिक व मानसिक स्वरुपाचे गंभींर आजार होतात. यात हृदयविकाराचा झटका, मधुमेह, मानसिक रोग, डोकेदुखी, स्मरणशक्ती कमी होणे, थॉयराईड, ग्रंथीचे आजार, वंंध्यत्व, लैंगिक समस्या, अॅसिडीटीचा त्रास होण्याची दाट शक्यता असते़ झोपेचे महत्त्व लक्षात घेऊनच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतर्गत (मेडिकल) येणाºया सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ‘रेस्पिरेटरी अॅण्ड स्लिप मेडिसीन’ विभागाने मागील वर्षी ‘फेलोशिप इन स्लीप मेडिसीन’ अभ्यासक्रम हाती घेतला. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने या अभ्यासक्रमाला मंजुरी देत दोन जागेला मान्यताही दिली. ‘एमडी रेस्पिरेटरी’, ‘एमडी जनरल मेडिसीन’ व ‘एमडी न्यूरोलॉजी’च्या विद्यार्थ्यांनाच हा अभ्यासक्रम निवडता येणार होता. परंतु एक वर्षाच्या या अभ्यासक्रमाला २०१८ मध्ये विद्यार्थीच मिळाले नाहीत. एकीकडे झोपेशी निगडित आजार ही जागतिक समस्या असताना व सुमारे ४५ टक्के लोक या आजारातून जात असतानाही याचा अभ्यास करणारे विद्यार्थी मिळत नसल्याने या क्षेत्रातील तज्ज्ञानी आश्चर्य व्यक्त केले आहे. पुढील वर्षी म्हणजे २०१९ मध्ये तरी विद्यार्थी मिळतील या आशेवर हा विभाग आहे.