वैद्यकीय विद्यार्थ्यांनी लावला सहा कोटींचा चुना

By admin | Published: September 23, 2015 06:49 AM2015-09-23T06:49:44+5:302015-09-23T06:49:44+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) विद्यार्थ्यांनी वेळोवेळी शैक्षणिक व महाविद्यालयीन शुल्काचा भरणाच

Medical students opted for six crores | वैद्यकीय विद्यार्थ्यांनी लावला सहा कोटींचा चुना

वैद्यकीय विद्यार्थ्यांनी लावला सहा कोटींचा चुना

Next

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) विद्यार्थ्यांनी वेळोवेळी शैक्षणिक व महाविद्यालयीन शुल्काचा भरणाच केला नसल्याचा प्रकार उपअधिष्ठाता डॉ. मकरंद व्यवहारे यांनी मंगळवारी उघडकीस आणल्याने खळबळ उडाली आहे. सुमारे दोन कोटीच्यावर ही रक्कम आहे. धक्कादायक म्हणजे, २००६ पासून विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाचे व दर वर्षाचे परीक्षा शुल्क सोडल्यास इतर कोणतेही शुल्क भरले नसल्याने साधारण सहा कोटीचा फटका शासनाला बसल्याची माहिती आहे.
मेडिकलच्या उपअधिष्ठाता पदाची सूत्रे चार महिन्यांपूर्वीच डॉ. व्यवहारे यांनी स्वीकारली. कामात सुसूत्रता आणि पारदर्शकपणा आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी महाविद्यालयाच्या एका वरिष्ठ लिपीकाने विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे ७५० अर्ज डॉ. व्यवहारे यांच्याकडे आणले. त्यांनी या सर्व विद्यार्थ्यांनी नियमानुसार वेळोवेळी शैक्षणिक व महाविद्यालयाच्या इतर शुल्काचा भरणा केला काय, अशी विचारणा केली. परंतु संबंधित लिपीकाकडून योग्य उत्तर न मिळाल्याने त्यांनी याची चौकशी केली. यात अनेक विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाचे सर्व शुल्क भरले होते, परंतु नंतरच्या वर्षी केवळ परीक्षेचे शुल्क वगळात इतर कोणतेही शुल्क भरले नसल्याचे लक्षात आले. याची लेखी माहिती त्यांनी तत्काळ अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांना कळवली. तसेच सर्व विद्यार्थ्यांना शुल्काचा पूर्ण भरणा न केल्यास परीक्षेचे अर्ज महाविद्यालयाकडून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येते पाठविण्यात येणार नसल्याची सूचनाही काढली. (प्रतिनिधी)

२००६ पासून दुर्लक्षच
डॉ. व्यवहारे यांच्या पाहणीत २०११ पासून सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे विविध शुल्कच भरले नसल्याची बाब उघडकीस आली. सायंकाळपर्यंत हा आकडा १ कोटी ८३ लाखांवर गेला होता. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार २००६ पासून महाविद्यलयांत सुरू आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी शासनाचे साधारण ६ कोटी ४८ लाख रुपये बुडविल्याची माहिती आहे. यात पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे शुल्क पकडल्यास हा आकडा २५ कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
एकाच दिवशी गोळा झाले २३ लाख
महाविद्यालयाचे शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे अर्ज विद्यापीठाला पाठविण्यात येणार नसल्याच्या सूचना उपअधिष्ठाता डॉ. व्यवहारे यांनी मंगळवारी लावल्या. याची दखल घेत सायंकाळपर्यंत मेडिकलच्या तिजोरीत विविध फीच्यापोटी २३ लाख रुपये जमा झाले होते.

ओपन गटासाठी दरवर्षी ७२ हजार रुपये शुल्क
मेडिकलमध्ये दरवर्षी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या २०० जागा भरल्या जातात. साडेचार वर्षाच्या या अभ्यासक्रमासाठी साधारण ५० टक्के विद्यार्थी खुल्या वर्गातून तर ५० टक्के विद्यार्थी आरक्षण श्रेणीतून प्रवेश घेतात. खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवणी फी ५८ हजार ५००, लायब्ररी फी १०००, स्टुडन्ट कौन्सिल आॅफ मेडिकल कॉलेजची फी ५००, अ‍ॅल्युमनी फी, ५००, जीमखाना फी ५००, डेव्हलपमेंट फी ५००, स्विमिंग पूल फी ५००, एमयुएचएस अश्वामेघ फी २५०, एमयुएचएस डेव्हलपमेंट फंड ५०, कॉलेज कॉशन मनी (डिपॉझिट ) ३०००, लेबॉरटरी (डिपॉझिट ) ५००, लायब्ररी (डिपॉझिट) २००० असे मिळून एकूण ७२ हजार रुपये भरणे आवश्यक असते. त्यानुसार सुमारे १०० विद्यार्थ्यांकडून दरवर्षी ७२ लाख रुपये शासनाच्या तिजोरीत जमा होणे अपेक्षित आहे. परंतु आतापर्यंत मेडिकल प्रशासनाने या प्रकाराला गंभीरतेने न घेतल्याने शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडला आहे.

Web Title: Medical students opted for six crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.