वैद्यकीय विद्यार्थिनींची वाहने पेटवली
By admin | Published: June 3, 2016 02:56 AM2016-06-03T02:56:16+5:302016-06-03T02:56:16+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) विद्यार्थिनींच्या दहा वाहनांना बुधवारी मध्यरात्री पेटवून दिल्याने खळबळ उडाली.
१० दुचाकींचा समावेश : मेडिकलच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) विद्यार्थिनींच्या दहा वाहनांना बुधवारी मध्यरात्री पेटवून दिल्याने खळबळ उडाली. वसतिगृह क्रमांक दोनमध्ये घडलेल्या या प्रकरणामुळे संपूर्ण मेडिकल हादरले असून सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे, नाशिक, पुणे या दोन शहरात दुचाकी जाळण्याचा घटना ताज्या असताना आता नागपुरातही हा प्रकार घडल्याने चर्चेला उधाण आले आहे.
महाराष्ट्रासह इतरही राज्यातून शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी मेडिकलमध्ये येतात. येथे एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दोन तर विद्यार्थिनींसाठी दोन वसतिगृह आहेत. अधिष्ठाता कार्यालयाच्या अगदी जवळच असलेल्या मुलींच्या वसतिगृह क्रमांक दोनमध्ये हा प्रकार घडला. या वसतिगृहामध्ये साधारण शंभरावर विद्यार्थिनींच्या निवासाची व्यवस्था आहे. रात्री १० नंतर वसतिगृहाचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले जाते. सर्वांची वाहने मुख्य द्वाराच्या आत उभी केली जातात. गुरुवारी पहाटे साधारण २.३० वाजताच्या सुमारास एका विद्यार्थिनीला आगीचे लोळ निघताना दिसले. तिने लागलीच आरडाओरड करीत इतरांना याची माहिती दिली. विद्यार्थिंनीनी अग्निशमन दलाला फोन केला. यावेळी वसतिगृहाच्या सुरक्षेसाठी मेडिकल प्रशासनाकडून केवळ एकच सुरक्षारक्षक तैनात होता.
वसतिगृहातील सुरक्षा वाढविणार
हा प्रकार नेमका कशामुळे घडला असावा, याची चौकशी केली जात आहे. विद्यार्थिनींच्या वसतिगृहातील सुरक्षा वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार गुरुवारपासून मॅस्कोचे आठ सुरक्षारक्षक मुलींच्या दोन वसतिगृहात तैनात राहतील. या शिवाय रात्री कठडे लावून तपासणीही केली जाईल.
-डॉ. अभिमन्यू निसवाडे,
अधिष्ठाता