मेडिकल : १० कोटी देऊनही औषधांचा पुरवठा थांबलेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 11:15 PM2021-05-28T23:15:39+5:302021-05-28T23:17:14+5:30
Supply of medicines stopped in Medical कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी मेडिकलमध्ये कोरोनाचे व म्युकरमायकोसिसचे मोठ्या संख्येत रुग्ण उपचाराखाली आहेत. याशिवाय, नॉनकोविडच्या रुग्णात वाढ झाली आहे. परंतु रुग्णालयात औषधांचा मोठा तुटवडा पडल्याने रुग्णांच्या अडचणी वाढल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी मेडिकलमध्ये कोरोनाचे व म्युकरमायकोसिसचे मोठ्या संख्येत रुग्ण उपचाराखाली आहेत. याशिवाय, नॉनकोविडच्या रुग्णात वाढ झाली आहे. परंतु रुग्णालयात औषधांचा मोठा तुटवडा पडल्याने रुग्णांच्या अडचणी वाढल्या आहेत. विशेष म्हणजे, औषधे खरेदीची जबाबदारी असलेल्या हाफकिन महामंडळाला मेडिकलने १० कोटी रुपये दिले. परंतु दोन महिन्याचा कालावधी होत असताना औषधी न मिळाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांवर पदरमोड करून बाहेरून औषधी विकत घेण्याची वेळ आली आहे.
औषधी व वैद्यकीय उपकरणांचे दर आणि मानके यामध्ये एकसूत्रता आणण्यासाठी व दर्जा व गुणवत्ता सुधारण्यास मदत होण्यासाठी औषधे व यंत्रसामग्री खरेदीचे केंद्रीकरण करण्याचा निर्णय २०१७ मध्ये घेतला. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांना औषधे व साहित्य खरेदीचा त्यांचा निधी ‘हाफकिन बायो-फार्मास्युटिकल्स कॉपोर्रेशन लिमिटेड’कडे वळता करण्याचे निर्देश दिले. परंतु चार वर्षे होऊनही औषधांसोबतच यंत्रसामग्रीचा पुरवठा सुरळीत झालेला नाही. प्राप्त माहितीनुसार, औषधांच्या खरेदीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) साडेसात कोटी तर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने दीड कोटी असे एकूण १० कोटी रुपये हाफकिनकडे वळते केले. परंतु दोन महिन्याचा कालावधी होऊन औषधी उपलब्ध झाली नाहीत. महामारीच्या या काळातही औषधांबाबत महामंडळ गंभीर नसल्याने याचा फटका रुग्णालय प्रशासनासोबतच रुग्णांना बसत आहे.
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर सलाईन विकत घेण्याची वेळ
म्युकरमायकोसिसच्या आजारावर ‘अॅम्पोटेरीसीन बी’ हे इंजेक्शन सलाईनमधून दिले जाते. परंतु मेडिकलमध्ये सलाईनचा तुटवडा पडल्याने, रुग्णांच्या नातेवाईकांना सलाईन बाहेरून विकत आणण्यास सांगितले जात आहे. इतरही महत्त्वाच्या औषधांसाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना बाहेरचा रस्ता दाखविला जात आहे. यामुळे गरीब रुग्णांच्या अडचणी वाढल्या आहेत.