मेडिकल : टीबी वॉर्डचे क्वॉर्टरही धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 11:45 PM2019-12-13T23:45:18+5:302019-12-13T23:47:02+5:30
मेडिकलच्या टीबी वॉर्ड परिसरातील त्वचा रोग विभागाचे गुरुवारी प्रवेशद्वारावरील स्लॅब कोसळून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेला घेऊन चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे राजाबाक्षा व टीबी वॉर्ड परिसरातील निवासी गाळेधारकांमध्ये (क्वॉर्टर) भीतीचे वातावरण पसरले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेडिकलच्या टीबी वॉर्ड परिसरातील त्वचा रोग विभागाचे गुरुवारी प्रवेशद्वारावरील स्लॅब कोसळून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेला घेऊन चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे राजाबाक्षा व टीबी वॉर्ड परिसरातील निवासी गाळेधारकांमध्ये (क्वॉर्टर) भीतीचे वातावरण पसरले आहे. हे क्वॉर्टरही ४० वर्षे जुने व अनेक ठिकाणी तडे गेले आहे. मेडिकलचे बांधकाम विभाग केवळ तात्पुरती डागडुजीपलिकडे जात नसल्याने कधीही धोका होण्याची शक्यता येथील रहिवासी वर्तवित आहे.
मेडिकलमध्ये सेवा देणाऱ्या चतुर्थ कर्मचाऱ्यांसाठी राजाबाक्षा परिसरात १२० तर टीबी वॉर्डाच्या परिसरात ९६ क्वॉर्टर आहेत. पूर्वी या क्वॉर्टरच्या देखभालीकडे व स्वच्छतेकडे स्वत: मेडिकल प्रशासन व बांधकाम विभाग लक्ष देऊन असायचे. अधिकारी या परिसराची पाहणी करायचे. परंतु गेल्या १५ वर्षांत या क्वॉर्टरकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाल्याचे येथील काही कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत. राजाबाक्षा येथे एक मजल्याचे सर्व्हंट क्वॉर्टर आहे. त्याची अवस्था फारशी चांगली नाही. या क्वॉर्टरच्या इमारतीचा कोणता भाग कधी पडेल याच नेम नाही. जुन्या काळातील इमारत असल्याने तग धरून असली तरी बांधकाम विभागाने इमारतीचे सर्वेक्षण करावे, अशी मागणी येथील रहिवाशांची आहे. हे क्वॉर्टर तोडून अजनी मेडिकल क्वॉर्टरसारखे या भागातही अपार्टमेंट बांधून कर्मचाऱ्यांना गाळे द्यावेत, अशी नव्याने मागणी होऊ लागली आहे.
कोणता भाग कधी पडेल याचा नेम नाही
येथील लोकांनी सांगितले, क्वॉर्टर फार जुने आहे. यातच उंदीर, घुस यांनी अनेक ठिकाणी पोखरून ठेवले आहे. काही भिंतीना भेगाही गेल्या आहेत. विशेषत: पायरीच्या भिंती या कमजोर झाल्या आहेत. दर पावसाळ्यात क्वॉर्टरचा कोणता ना कोणता भाग पडतो. यामुळे रहिवाशांमध्ये नेहमीच भीतीचे वातावरण असते. डागडुजीसाठी बांधकाम विभागाला सांगितल्यानंतरच ते कामाला सुरुवात करतात. परंतु त्यापूर्वी त्यांच्याकडून क्वॉर्टरची पाहणी करीत नसल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
कचरा, गटारीचीही समस्या
क्वॉर्टर परिसरातील कचऱ्याची उचल नियमित होत नाही. मोडकळीस आलेल्या गटार लाईनमुळे येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कमी व्यासाच्या पाईपलाईनमुळे कधी गटारी तुंबणार आणि त्याची घाण क्वॉर्टरमध्ये शिरणार याचा नेम नाही. विशेषत: पावसाळ्यात ही समस्या वारंवार उद्भवते. क्वॉर्टरमधील सार्वजनिक शौचालय निवासी गाळ्यांपासून दूर आहेत. यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जात नसल्याने दुर्गंधी पसरलेली असते.