मेडिकलच्या ट्रामा केअरमध्ये रक्त पुसायला कॉटनही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 08:39 PM2019-07-31T20:39:32+5:302019-07-31T20:44:13+5:30

नागपूर मेडिकल कॉलेजमधील वैद्यकीय सेवेच्या नावाने दिवसेंदिवस ओरड वाढत आहे. दाखल होणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना कटू अनुभव येत असल्याच्या तक्रारी आहेत. सोमवारी रात्री अपघातामध्ये जखमी झालेल्या रुग्णाला येथे दाखल केल्यावर चेहऱ्यावरील रक्त पुसण्यासाठी सकाळपर्यंत कुणी परिचारक उपलब्ध झाला नाही, एवढेच नाही तर साधा कॉटनही मिळू शकला नसल्याची विदारक स्थिती समोर आली आहे.

Medical trauma care does not even have a blood wipe cotton | मेडिकलच्या ट्रामा केअरमध्ये रक्त पुसायला कॉटनही नाही

मेडिकलच्या ट्रामा केअरमध्ये रक्त पुसायला कॉटनही नाही

googlenewsNext
ठळक मुद्देफलकावर ‘नो कॉटन’ची सूचना : रक्ताळलेल्या जखमा घेऊन राहतात रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर मेडिकल कॉलेजमधील वैद्यकीय सेवेच्या नावाने दिवसेंदिवस ओरड वाढत आहे. दाखल होणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना कटू अनुभव येत असल्याच्या तक्रारी आहेत. सोमवारी रात्री अपघातामध्ये जखमी झालेल्या रुग्णाला येथे दाखल केल्यावर चेहऱ्यावरील रक्त पुसण्यासाठी सकाळपर्यंत कुणी परिचारक उपलब्ध झाला नाही, एवढेच नाही तर साधा कॉटनही मिळू शकला नसल्याची विदारक स्थिती समोर आली आहे.


संजय गांधीनगर येथे राहणारा आकाश लांडगे (३५ वर्षे) हा युवक सोमवारच्या रात्री ओंकारनगर चौकालगत पाणी साचलेल्या खड्ड्यामुळे दुचाकीवरून पडून जखमी झाला. त्याच्या चेहऱ्याला चांगलेच खरचटले आहे. या अपघातानंतर परिसरातील युवकांनी आणि पोलिसांनी त्याला वैद्यकीय महाविद्यालयाच्या ट्रामा केअर युनिटमध्ये दाखल केले. रात्री १२ वाजतानंतर त्याला उपचारासाठी दाखल करूनही सकाळपर्यंत कसलेही उपचार झाले नाहीत. रात्रपाळीत असलेल्या डॉक्टरांनीही या रुग्णाची सेवेसाठी नोंद घेतली नाही. सोबत आलेल्या नातेवाईकांनी आणि युवकांनी रुग्णालयातील परिचारकाला शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र पहाटेपर्यंत परिचारक उपलब्ध झाला नाही. दरम्यान त्याचा चेहरा रक्ताने माखला होता. त्यावर खरचटल्याने खोलवर जखमाही झाल्या होत्या. त्या जखमा आणि रक्त पुसण्यासाठी सोबतच्या नातेवाईकांनी कॉटन मागितले. मात्र रुग्णालयात कॉटनच नसल्याचे उत्तर देण्यात आले. अखेर रुमालाने जखमा पुसून नातेवाईकांनी रात्र काढली. सकाळी जखमेवर थातूरमातूर मलमपट्टी करण्यात आली. मात्र सुमारे आठ ते नऊ तास या रुग्णाला वेदनांनी विव्हळावे लागले.
आकस्मिक विभागामध्ये १५ बेड असून, उपचारासाठी येणाºया रुग्णांची संख्या ३० वर असते. दाखल रुग्णाला दोन अथवा तीन तास या ठिकाणी ठेवून व प्रथमोपचार करून अन्य वॉर्डात रेफर केले जाते. कॉटन आणि बँडेज पट्ट्यांची टंचाई या विभागात नवीन नाही. मागील आठवडाभरापासून ही परिस्थिती असल्याचे एका परिचारिकेने सांगितले. आम आदमी पार्टीचे दक्षिण तालुकाध्यक्ष असलेले शुभम पराळे म्हणाले, या रुग्णालयात आता हे नेहमीचेच झाले आहे. फ्रॅक्चर रुग्णाचा एक्स-रे काढायचा असला तरी चार ते पाच तास लागतात. चार महिन्यांपूर्वी सोनू डोंगरे या युवकाचा अपघात झाला असता आपण स्वत: एक्स-रेसाठी रात्री ११.३० वाजता रांगेत लागलो. पहाटे ४ वाजता नंबर लागला. एक्स-रेसाठी एवढा वेळ लागत असेल तर अन्य सेवा किती तत्परतेने मिळत असतील, याचा विचारच न केलेला बरा.
बँडेज कॉटन नॉट अ‍ॅव्हेलेबल 

दुपारी प्रस्तुत प्रतिनिधीने रुग्णालयात जाऊन पाहिले असता ट्रामा केअर युनिटच्या आकस्मिक विभागातील फलकावर ‘कॉटन बँडेज नॉट अ‍ॅव्हेलेबल’असे ठळकपणे लिहिलेले दिसले. यासंदर्भात रुग्णालयात असलेल्या परीविक्षाधीन आणि प्रशिक्षार्थी डॉक्टरांना विचारणा केली असता, आकस्मिक विभागाला दिलेले कॉटन आणि बँडेज पट्ट्या संपल्याचे सांगण्यात आले. आकस्मिक विभागात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने आणि कॉटन व बँडेज पट्ट्यांचा वापर अधिक होत असल्याने या वस्तू लवकर संपतात, अशी माहिती त्यांनी दिली. भांडार विभागाकडे मागणी केली असून, सध्या तरी उपलब्धता नसल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Medical trauma care does not even have a blood wipe cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.