उपराजधानीतील मेडिकल, मेयोतील निवासी डॉक्टर १ ऑक्टोबरपासून संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2021 10:01 PM2021-09-29T22:01:39+5:302021-09-29T22:02:12+5:30
Nagpur News कोरोनाची दुसरी लाट ओसरूनही आश्वासनांची पूर्तता होताना दिसत नाही. यामुळे नाराज झालेल्या राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी १ ऑक्टोबरपासून काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूर : कोरोनाकाळात मागील दीड वर्षापासून सातत्याने सेवा देेणाऱ्या निवासी डॉक्टरांची शैक्षणिक शुल्क माफ करण्याचे आणि इन्सेन्टिव्ह देण्याचे आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आले होते. मात्र कोरोनाची दुसरी लाट ओसरूनही आश्वासनांची पूर्तता होताना दिसत नाही. यामुळे नाराज झालेल्या राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी १ ऑक्टोबरपासून काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपुरातील मेडिकल कॉलेज आणि मेयोमधील निवासी डॉक्टरांनी या आंदोलनाचे समर्थन केले आहे. शासन स्तरावर सेंट्रल मार्डच्या प्रतिनिधींची चर्चा सुरू आहे. मात्र काहीच तोडगा न निघाल्याने आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय येथील निवासी डॉक्टरांनी घेतला आहे.
काम बंद आंदोलनामुळे आरोग्य सेवा विस्कळीत होऊ शकते. मेयोमध्ये १५०, तर मेडिकलमध्ये ६०० निवासी डॉक्टर आहेत. यांपैकी कोविड इमर्जन्सी आणि आईसीयूमधील सेवा नियमित ठेवण्याचा निर्णय या डॉक्टरांनी घेतला आहे. बुधवारी मेडिकल कॉलेज आणि मेयो रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आपल्या आंदोलनासंदर्भात अधिष्ठातांना पत्र सादर केले.
मेडिकल मार्डचे अध्यक्ष डॉ. सजल बन्सल म्हणाले, कोरोनाकाळात जीव धोक्यात घालून आम्ही सेवा बजावली. शैक्षणिक शुल्कमाफीचे आणि अन्य सवलती देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. प्रत्यक्षात असे झाले नाही. यामुळे सेंट्रल मार्डच्या आवाहनानुसार या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. मेयो मार्डचे अध्यक्ष नितीन जगताप यांनीही निवेदन देऊन आंदोलनाच्या समर्थनाचा निर्णय घेतला आहे.
प्रशासन सक्रिय
निवासी डॉक्टरांचे संभाव्य आंदोलन लक्षात घेऊन मेडिकल आणि मेयोचे प्रशासन पर्यायी व्यवस्था करण्याच्या तयारीत लागले आहे. एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसह वरिष्ठ डॉक्टरांना या काळात सेवेत सहभागी करण्याचा निर्णय घेतला आहे.
...