मेडिकल : वॉर्ड २५ मध्ये शिरले पाणी, रुग्णांना हलविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 08:45 PM2019-09-06T20:45:00+5:302019-09-06T20:45:58+5:30
शुक्रवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मेडिकलच्या काही भागात पाणी शिरले. विशेषत: ‘सेमी आयसीयू’ म्हणून असलेल्या वॉर्ड क्र. २५ मध्ये पावसाचे पाणी जमा झाल्याने खळबळ उडाली. येथील गंभीर रुग्णांना तातडीने वॉर्ड क्र. २७ मध्ये हलविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शुक्रवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मेडिकलच्या काही भागात पाणी शिरले. विशेषत: ‘सेमी आयसीयू’ म्हणून असलेल्या वॉर्ड क्र. २५ मध्ये पावसाचे पाणी जमा झाल्याने खळबळ उडाली. येथील गंभीर रुग्णांना तातडीने वॉर्ड क्र. २७ मध्ये हलविण्यात आले. सर्जरी व मेडिसीन विभागाच्या आकस्मिक विभागासमोर साधारण गुडघाभर पाणी साचले. नातेवाईकांना आपल्या रुग्णांना उचलून आत नेण्याची वेळ आली.
मेडिकलमध्यो पावसाचे पाणी शिरण्याची ही पहिली घटना नाही. सलग चार-पाच तास मुसळधार पाऊस झाल्यास रुग्णालयात पाणी शिरते. गेल्या वर्षी शल्यक्रिया विभागाच्या आकस्मिक विभागात शिरले. यावेळी खाटेवर दहावर रुग्ण होते. पाहतापाहता गुडघाभर पाणी साचले. पाणी जायला जागा नसल्याने करावे काय, हा प्रश्न होता. डॉक्टर, परीचारिका व कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णांना बाजूच्या वॉर्डात हलविले. विशेष म्हणजे, आकस्मिक विभागाच्या किरकोळ शस्त्रक्रिया गृहातही पाणी शिरले. सर्वत्र पाणीचपाणी असल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली होती. या वर्षी मात्र या विभागात पाणी शिरले नसलेतरी समकक्ष अतिदक्षता विभाग असलेल्या वॉर्ड क्र. २५ मध्ये पाणी शिरल्याने रुग्णालय प्रशासनाची तारांबळ उडाली. बाहेर मुसळधार पाऊस आणि वॉर्डात साचत असलेल्या पाण्यामुळे काही वेळेसाठी भीतीचे वातावरण तयार झाले होते. सफाई कर्मचारी, अटेन्डंट यांनी तातडीने रुग्णांना स्ट्रेचर व व्हीलचेअरवर बसवून वॉर्ड क्र. २७ मध्ये हलविले. सायंकाळपर्यंत पावसाचा जोर ओसरल्यानंतर वॉर्डाची स्वच्छता करण्यात आली.
औषधेही भिजली
मुसळधार पावसामुळे मेडिसीन व सर्जरी विभागाच्या अपघात विभागासमोर तीन ते चार फूट पाणी साचले. बाहेरून येणाऱ्या रुग्णांना या पाण्यातून वाट काढत जावे लागले तर गंभीर रुग्णांना उचलून न्यावे लागले. वॉर्ड १७ व १८ च्यासमोरही पाणी साचले होते. अशीच स्थिती २७, ३५ व ३६ समोरील होती. वॉर्ड क्र. ४२ समोरून गेलेली सांडपाण्याची लाईन तुंबल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. नेहमीप्रमाणे औषध भांडारात पावसाचे पाणी शिरले. पाणी काढण्याकरिता येथे मोटार पंपाची व्यवस्था आहे. परंतु मुसळधार पावसापुढे पंपाचा फारसा उपयोग होऊ शकला नाही. परिणामी, औषधे भिजल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, जमिनीखाली असलेल्या या भांडारासाठी ९ कोटी २१ लाख खर्चून नवीन इमारत बांधण्यात आली. परंतु ही इमारत अद्यापही कुलपात आहे.