‘गोरखपूर’च्या मार्गावर मेडिकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:37 AM2017-09-19T00:37:06+5:302017-09-19T00:37:33+5:30
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना (मेडिकल) औषधे खरेदीसाठी असलेले दर करार (रेट कॉन्ट्रॅक्ट) संपून दोन महिने झाले.
सुमेध वाघमारे । लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना (मेडिकल) औषधे खरेदीसाठी असलेले दर करार (रेट कॉन्ट्रॅक्ट) संपून दोन महिने झाले. औषधांवर सेवा व वस्तूकर (जीएसटी) लावण्यात आल्याने औषध पुरवठादार जुन्या दरात औषधे देण्यास तयार नाहीत. यामुळे बहुसंख्य मेडिकलमध्ये जीवनरक्षक व जीवनोपयोगी औषधांचा ठणठणाट आहे.
या गंभीर समस्येकडे वैद्यकीय शिक्षण विभागाचे (डीएमईआर) दुर्लक्ष झाल्याने राज्यातील मेडिकल ‘गोरखपूर’च्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. शेवटच्या घटका मोजणाºया रुग्णांसाठी मेडिकल रुग्णालय आशेचा किरण आहेत. रोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. परंतु पाचमधून केवळ दोन ते तीन औषधे उपलब्ध करून दिली जात आहे. इतर औषधांसाठी बाहेरचा रस्ता दाखविला जात आहे. अतिदक्षता व आकस्मिक विभागातील रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयातून कमी आणि बाहेरूनच जास्तीतजास्त औषधे आणावी लागत असल्याचे चित्र आहे. नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) जीवनरक्षक औषधे जेमतेम उरलेली आहेत,
तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) ‘आरसी’ संपण्यापूर्वी औषधे घेतली असली तरी ‘आरसी’ला आणखी उशीर झाल्यास हेही रुग्णालय अडचणीत येण्याची शक्यता आहे. अशीच स्थिती राज्यभरातील सर्वच मेडिकलची आहे. विशेष म्हणजे, बहुसंख्य रुग्णालयांकडून ‘आरसी’ नूतनीकरणाचे पत्र व स्मरणपत्रही गेले आहे. परंतु वैद्यकीय शिक्षण विभाग अद्यापही याला गंभीरतेने घ्यायला तयार नसल्याचे दिसून येत आहे.
पुरवठादाराने रोखले हात
औषधांवर जीएसटी लावण्यात आली आहे. परंतु वैद्यकीय शिक्षण विभागाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना याबाबतची स्पष्ट माहिती दिली नाही. परिणामी, संभ्रम निर्माण झाला असून औषध पुरवठादाराने औषधे देण्यास तूर्तास तरी हात रोखले आहे.
मोजकाच साठा
जीवनरक्षक औषधांमध्ये सर्व सलाईन, सर्पदंश, कुत्रा चावल्यानंतर देण्यात येणारी लस, हृदयविकार, विष प्राशन व इतरही गंभीर प्रसंगी देण्यात येणाºया लसी येतात. साधारण ३५ ते ३० लसींचा यात समावेश असतो. सर्वच मेडिकल रुग्णालयांना आकस्मिक व अतिदक्षता विभागात याचा पर्याप्त मात्रेत साठा करून ठेवावा लागतो. परंतु सद्यस्थितीत हा साठा संपण्याच्या मार्गावर असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे,
स्थानिक खरेदीही बंद
राज्यातील सर्व मेडिकलमधील औषधांची खरेदी १५ आॅगस्टपासून मध्यवर्ती खरेदी समितीमार्फत होणार होती. यामुळे स्थानिक खरेदी बंद करण्यात आली आहे. यातच ‘आरसी’ही संपल्याने मूलभूत औषधांसह दैनंदिन व जीवनरक्षक औषधे-प्रतिजैविकांचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे. गोरगरीब रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत.
औषधांची खरेदी आता मध्यवर्ती समितीमार्फतच होणार आहे. या समितीमार्फत ‘आरसी’ जर लवकर तयार होत असेल तर मुदतवाढ मिळणार नाही, परंतु यात जर वेळ लागत असेल तर मुदतवाढ देण्यात येईल. यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.
-डॉ. प्रवीण शिनगारे
संचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग