संगणकाच्या पडद्यावर वैद्यकीय विश्व
By admin | Published: January 1, 2017 03:06 AM2017-01-01T03:06:34+5:302017-01-01T03:06:34+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ७ कोटी ५२ लाख रुपये खर्चून ई-लायब्ररीचे बांधकाम झाले.
मेडिकलची लायब्ररी झाली ‘ई-लायब्ररी’ : संगणक, इंटरनेटची सोय उपलब्ध
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ७ कोटी ५२ लाख रुपये खर्चून ई-लायब्ररीचे बांधकाम झाले. परंतु दुसऱ्या टप्प्यातील साधारण आठ कोटींचा निधीच मिळाला नाही. यामुळे फर्निचर व संगणकीकरणाच्या अभावी ‘ई’ नसलेली लायब्ररी दोन वर्षांपासून सुरू होती. परंतु आता आवश्यक फर्निचर, २५ संगणक, इंटरनेट व ‘२५ नोट’ उपलब्ध करून देण्यात आल्याने संगणकाच्या पडद्यावर वैद्यकीय विश्व उभे झाले आहे. याचा फायदा पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना होणार आहे. याचे विधिवत उद्घाटन नव्या वर्षात होऊ घातले आहे.
ई-लायब्ररीच्या बांधकामाला २०११ मध्ये मंजुरी मिळाली. ४१०६.७४३ चौ.मी.मध्ये पसरलेल्या या एक मजली ई-लायब्ररीचे बांधकाम २०१४ मध्ये पूर्ण झाले. लायब्ररीत पुस्तकांच्या ऐवजी संगणक राहणार होते. या संगणकांना उपग्रहाशी जोडण्यात येणार होते. एकाच वेळी साधारण २०० विद्यार्थी या ई-लायब्ररीचा लाभ घेऊ शकणार होते. राज्यात अशाप्रकारच्या लायब्ररी इतरही मोठ्या शहरांमध्ये भविष्यात तयार करून त्या सर्व एकमेकांशी जोडण्यात येणार होत्या. संपूर्ण डिजिटल असणाऱ्या या लायब्ररीत जगात कोठेही वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्याख्यान, कार्यक्रम सुरू असेल अथवा डाटा असेल तर त्याला या लायब्ररीला जोडून येथे बघता येणार होते.
याशिवाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सोय राहणार होती. परंतु संगणकच नसल्याने या सर्व आवश्यक गोष्टींवर पाणी फेरले. या लायब्ररीच्या उद्घाटनाच्या वेळी खुद्द तत्कालीन उपमुख्यमंत्री उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले होते, मात्र दोन वर्षे होऊनही ते पूर्ण झाले नाही.
मेडिकल प्रशासनाने यासंबंधी वारंवार प्रस्ताव पाठविले. परंतु आश्वासनापलीकडे काहीच हाती लागत नव्हते. अखेर अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी सद्यस्थितीत २५ संगणक, त्याला लागणारे फर्निचर, २५ नोट उपलब्ध करून दिले आहे. यामुळे ही लायब्ररी आता खऱ्या अर्थाने ‘ई-लायब्ररी’ झाली आहे.(प्रतिनिधी)
असा होणार फायदा
या लायब्ररीमुळे तूर्तास पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आणि वैद्यकीय शिक्षकांना संशोधनाकरिता विविध विषयातील ‘ई-जर्नल्स’ तातडीने उपलब्ध होतील. वैद्यकीय क्षेत्रातील जाडजूड पुस्तकांना फाटा देऊन संगणकाच्या पडद्यावर हे पुस्तक उपलब्ध होईल. याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. लवकरच याचे विधिवत उद्घाटन होईल, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी ‘लोकमत’ला दिली.