मेडिकल : ६२ हजार औषधांचा साठा केला बाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 12:27 AM2019-10-12T00:27:57+5:302019-10-12T00:30:47+5:30
नागपूर मेडिकलमधील सुमारे ६२ हजार गोळ्या व १५ हजारावर इंजेक्शनचा साठा बाद करण्यात आला. या औषधामध्ये कॅन्सरला कारणीभूत ठरणारी तत्त्वे आढळून आल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात प्राप्त झालेल्या ‘अॅसिडिटी’वरील ‘रॅनिटिडीन’ इंजेक्शनमध्ये नोव्हेंबर २०१८ मध्ये दोष आढळून आला. तब्बल वर्षभरानंतर आता ‘रॅनिटिडीन’ गोळ्या व इंजेक्शनचा वापर तातडीने थांबविण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने दिले आहे. यामुळे नागपूर मेडिकलमधील सुमारे ६२ हजार गोळ्या व १५ हजारावर इंजेक्शनचा साठा बाद करण्यात आला. या औषधामध्ये कॅन्सरला कारणीभूत ठरणारी तत्त्वे आढळून आल्याची माहिती आहे. अन्न व औषध प्रशासन याची तपासणी करीत आहे.
घाटी रुग्णालयात रॅनिटिडीन इंजेक्शनच्या एका बॅचमध्ये बुरशीसदृश प्रकार गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर रोजी समोर आला होता. दोष आढळून आलेल्या तब्बल २२ हजार इंजेक्शनचा रुग्णांना वापर झाल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते. तब्बल वर्षभरानंतर गेल्याच आठवड्यात या औषधांचा वापर थांबविण्याचे पत्र सर्व रुग्णालयांना आरोग्य विभागाने दिले. प्राप्त माहितीनुसार, राज्यातील सर्वच मेडिकलला हाफकिन कंपनीकडून या इंजेक्शन व गोळ्यांचा पुरवठा करण्यात आला होता. दोष असल्याची शंका समोर येताच या औषधासंदर्भात अनेक देशांचे अहवाल गोळा करण्यात आले. त्यानुसार ‘रॅनिटिडीन’ औषधांमध्ये ‘एन-नायट्रोसोडामिथेलायमाइन’ (एनडीएमए) कमी प्रमाणात आढळून आले. ‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर’ या संस्थेनुसार सदर घटक कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतो. यामुळे राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने ‘रॅनिटिडीन’च्या उत्पादकांकडील कच्चा माल व इतर आवश्यक बाबींची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहे तर आरोग्य विभागाने पुढील आदेशापर्यंत इंजेक्शन व गोळ्यांचा वापर थांबविण्याचा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नागपूर मेडिकलला उपलब्ध झालेल्या गोळ्या व इंजेक्शन रुग्णसेवेतून बाद करण्यात आले आहे. यात सुमारे ६२ हजार गोळ्या व १५ हजार इंजेक्शन असल्याचे बोलले जात आहे. धक्कादायक म्हणजे, पुरवठा झालेल्या ३० टक्के औषधांचा वापर झाला आहे.