कोरोना पॉझिटिव्ह चिमुकल्यांसोबत मेडिकलने जोडले अनोखे नाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 11:12 AM2020-04-22T11:12:21+5:302020-04-22T11:16:17+5:30
मेडिकलमध्ये सात महिन्याच्या चिमुकल्यापासून ते ३ ते ११ वर्षांपर्यंतची सहा पॉझिटिव्ह मुले दाखल आहेत याची दखल मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी घेतली. स्वत:च्या पैशातून या मुलांना दैनंदिन गरजेसाठी लागणाऱ्या टुथब्रशपासून ते बिस्कीट, केकपर्यंतचा खाऊ ते देत आहेत. रुग्णासोबतचे एक अनोखे नाते ते जपत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव नागपुरात वाढतच चालला आहे. याचा सर्वाधिक फटका बसत आहे तो लहान मुलांना. मेडिकलमध्ये सात महिन्याच्या चिमुकल्यापासून ते ३ ते ११ वर्षांपर्यंतची सहा पॉझिटिव्ह मुले दाखल आहेत. यातील बहुतांश गरीब घरातील. अनेकांकडे रोज लागणाऱ्या वस्तूही नाहीत. याची दखल मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी घेतली. स्वत:च्या पैशातून या मुलांना दैनंदिन गरजेसाठी लागणाऱ्या टुथब्रशपासून ते बिस्कीट, केकपर्यंतचा खाऊ ते देत आहेत. रुग्णासोबतचे एक अनोखे नाते ते जपत आहेत. रुग्णालयाच्या सर्व व्यवस्थापनेची जबाबदारी वैद्यकीय अधीक्षकावर राहत असल्याने सर्वच शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक हे पद तसे काटेरी मुकुट म्हणूनच कुप्रसिद्ध आहे. रुग्णालयीन कामकाज सुरळीत चालावे यासाठी कधी कठोरतेने तर कधी प्रेमाने सर्वांना सोबत घेऊनच त्यांना चालावे लागते. २४ तास ‘अलर्ट’ राहावे लागते. ‘मास कॅज्युल्टी’पासून ते मंत्री, अधिकारी यांच्या आकस्मिक दौऱ्यात सहभागी व्हावे लागते. रुग्णाच्या तक्रारी, नातेवाईकांचे आरोप, निवासी डॉक्टरांचे प्रश्न, परिचारिका व कर्मचाऱ्यांना येणाऱ्या विविध समस्याही त्यांनाच सोडवाव्या लागतात. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांचा पाठिंबा व मार्गदर्शनामुळे डॉ. गावंडे यांनी रुग्णालयाची धुरा व्यवस्थित सांभाळली आहे. अधिष्ठात्यांच्या विश्वासाला ते खरे उतरले आहेत. यामुळे रोज नव्या जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर पडत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यासोबत सर्व विभागप्रमुख, वरिष्ठ डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांसोबतच वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातील त्यांची चमू दिवस-रात्र काम करीत आहे. सध्या त्यांच्याकडे कोरोनाचे ४५ रुग्ण भरती आहेत. सात रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या रुग्णांमधील नवे आव्हान उभे ठाकले आहे ते कोरोना पॉझिटिव्ह चिमुकल्यांचे. यातील अनेकांना आपल्याला येथे का आणले, हे माहितच नाही. एकाच खोलीत त्यांना औषधोपचारासह १४ दिवस काढावे लागणार असल्याने बालसुलभ मनाचा विचार डॉ. गावंडे यांनी केला आहे. ते स्वत: बालरोगतज्ज्ञ आहेत. यामुळे लहान मुलांची मानसिकता ओळखून आहेत, म्हणूनच या रुग्णांकडे ते विशेष लक्ष देत आहेत. त्यांना स्वच्छतेचे धडे देत आहेत. सोबतच ‘पसर्नल हायजिन’ पाळण्यासाठी टुथब्रश, टुथपेस्ट व इतरही वस्तू स्वत:कडून उपलब्ध करून देत आहेत. रुग्णसेवेत चांगला प्रतिसाद देणाऱ्या चिमुकल्यांना शाबासकी म्हणून केक, चॉकलेट, बिस्कीट देत आहेत. लवकरच अशा मुलांसाठी काही खेळणी, पुस्तकेही ते उपलब्ध करून देणार आहेत. या मुलांसाठी ते डॉक्टर अंकल झाले आहेत.