मेडिकलचे कोविड हॉस्पिटल आदर्श : वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख यांनी केले ट्विट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 09:28 PM2020-04-25T21:28:28+5:302020-04-25T21:30:16+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) ‘कोविड हॉस्पिटल’ हे राज्यात आदर्श म्हणून पाहिले जात आहे. अनेकांसांठी हे हॉस्पिटल मार्गदर्शक ठरेल, असे ट्विट स्वत: वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) ‘कोविड हॉस्पिटल’ हे राज्यात आदर्श म्हणून पाहिले जात आहे. अनेकांसांठी हे हॉस्पिटल मार्गदर्शक ठरेल, असे ट्विट स्वत: वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केले. जखमी रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या ‘ट्रॉमा केअर सेंटर’ला २२० खाटांच्या कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करण्यास केवळ १० दिवसांत मेडिकलला यश आले. २६ एप्रिलपासून हे हॉस्पिटल कोरोनाच्या गंभीर रुग्णांच्या सेवेत सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, येथे ६० खाटांच्या आयसीयू’सोबतच स्वतंत्र क्ष-किरण विभाग, स्वतंत्र शस्त्रक्रिया गृह, स्वतंत्र प्रयोगशाळा, स्वतंत्र रक्त साठा केंद्र असणार आहे. रुग्णालयातून कुणाला संसर्ग होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. मध्य भारतातील सर्व सोयींनी सज्ज असलेले हे पहिले ‘कोविड हॉस्पिटल’ आहे. या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने २५ एप्रिल रोजी प्रकाशित केले. याची दखल घेत अनेकांनी मेडिकलच्या कार्याचे कौतुक केले. वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख यांनी म्हटले की, नागपूर मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेत आवश्यक बाबींसोबतच डॉक्टरांचे आरोग्य जपले जाईल, याकडेही लक्ष दिले आहे. हे हॉस्पिटल इतरांसाठी मार्गदर्शक ठरेल.