मेडिकलने घेतला मोकळा श्वास

By admin | Published: October 21, 2014 12:54 AM2014-10-21T00:54:19+5:302014-10-21T00:54:19+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) सफाई व्यवस्था मागील अनेक वर्षांपासून कोलमडली होती. मेडिकलच्या खिडक्यांवर, सज्ज्यांवर, प्रवेशद्वारालगत, वॉर्डातील मागच्या भागात

Medicare has breathing freely | मेडिकलने घेतला मोकळा श्वास

मेडिकलने घेतला मोकळा श्वास

Next

३०० ट्रक काढला कचरा : रुग्णालय स्वच्छता अभियान
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) सफाई व्यवस्था मागील अनेक वर्षांपासून कोलमडली होती. मेडिकलच्या खिडक्यांवर, सज्ज्यांवर, प्रवेशद्वारालगत, वॉर्डातील मागच्या भागात सर्वत्र कचऱ्याचा ढीग लागला होता. मेडिकलच्या आत आणि बाहेर दुर्गंधी पसरलेली होती. सततच्या दुर्गंधीने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांचे आरोग्य धोक्यात आले होते. सफाईच्या कामावर मिसेस सीएम यांनीही बोट ठेवले होते. एकीकडे मेडिकलच्या सफाईला घेऊन ताशेरे ओढले जात असताना अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी पदभार स्वीकारताच महिन्याभरात मेडिकलला चकाचक करून दाखविले.
विशेष म्हणजे, मेडिकलमध्ये शनिवारी शासनाच्या आदेशानुसार रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली, परंतु त्यापूर्वीच मेडिकलने स्वच्छतेचा मोकळा श्वास घेतला होता.
मेडिकलमध्ये सुमारे २५० च्या वर सफाई कामगारांच्या जागा रिक्त आहेत. यातील पन्नास टक्के कर्मचाऱ्यांनी पन्नाशी ओलांडली आहे. मोजकेच सफाई कर्मचारी स्वच्छता करण्याचे आव्हान पेलत असल्याने सफाईची कामे योग्य पद्धतीने होत नव्हती. यातच शासनाने घेतलेला स्वच्छतेच्या आउटसोर्सिंगचा निर्णय थंडबसत्यात गेला. यामुळे मेडिकल प्रशासन, रुग्ण व त्याचे नातेवाईकांना अस्वच्छता, दुर्गंधीला सामोरे जावे लागत होते.
मेडिकलचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांची बदली होताच आणि डॉ. निसवाडे यांच्याकडे ही जबाबदारी येताच त्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक करून नियोजनबद्ध पद्धतीने सफाईची कामे हाती घेतली. त्यांच्या या कार्यात वैद्यकीय अधीक्षक डॉ. जगदीश हेडाऊ, उपअधीक्षक डॉ. सुभाष ठाकरे व डॉ. रमेश पराते यांनी भरीव मदत केली. यामुळे रुग्णालयाचा आत आणि बाहेरचा परिसर स्वच्छ होऊ लागला आहे. मेडिकलच्या खिडक्यांवर, सज्ज्यांवर, प्रवेशद्वारालगत, वॉर्डातील मागच्या भागात नेहमीच दिसून येणारे कचऱ्याचे ढिगारे नाहीसे झाले आहेत. मेडिकल प्रशासनाने आपल्या विभागाची स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी त्या-त्या विभागप्रमुखांकडे सोपविली आहे. मागील काही दिवसांमध्ये मेडिकलमधून ३०० ट्रक कचरा काढल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Medicare has breathing freely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.