महिलांमध्ये ४० टक्क्यांनी वाढला औषधास दाद न देणारा क्षयरोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2022 05:58 PM2022-03-24T17:58:10+5:302022-03-24T18:01:14+5:30
मागील चार वर्षांत महिलांमध्ये ‘डीआरटीबी’च्या प्रमाणात ४० टक्क्याने वाढ झाली. मेडिकलच्या श्वसनरोग विभागाने केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष पुढे आला आहे.
नागपूर : क्षयरोगाच्या औषधास दाद न देणाऱ्या क्षयरोगाचे (डीआरटीबी) प्रमाण वाढत आहे. २००७ ते २०२२ या १५ वर्षांच्या कालावधीत अशा १,९०९ रुग्णांची नोंद झाली. यात ६४ टक्के पुरुष तर ३६ टक्के महिला आहेत. धक्कादायक म्हणजे, मागील चार वर्षांत महिलांमध्ये ‘डीआरटीबी’च्या प्रमाणात ४० टक्क्याने वाढ झाली. मेडिकलच्या श्वसनरोग विभागाने केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष पुढे आला आहे. या विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात हा अभ्यास झाला.
क्षयरोग हा जगातील सर्वात प्राणघातक संसर्गजन्य रोगांपैकी एक आहे. जगात दररोज या रोगाचे २८ हजार रुग्ण आढळून येतात तर ४ हजार १०० लोकांचा मृत्यू होतो. डॉ. मेश्राम यांनी सांगितले, २००७ ते २०२० या कालावधीत ‘डीआरटीबी’चे ४,०५,६४८ रुग्ण आढळले. यात ३,५२,४५२ रुग्णांना ‘एमडीआर’, १४,९३६ रुग्णांना ‘एक्सडीआर’ तर ३८,२६० रुग्णांना ‘पॉलिरेसिस्टंट’ झाले. ‘एमडीआर’मधून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ४९ टक्के, ‘एक्सडीआर’मधून बरे होण्याचे प्रमाण ३६ टक्के तर पॉलिरेसिस्टंटमधून बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के होते. याला गंभीरतेने घेत मेडिकलच्या श्वसनरोग विभागाच्या डॉक्टरांनी ‘डीआरटीबी’ रुग्णांचा अभ्यास केला.
-महिलांमध्ये अशी झाली ‘डीआरटीबी’ची वाढ
डॉ. मेश्राम म्हणाले, अभ्यासात असे आढळून आले की, २००८ ते २०१२ या वर्षांत महिलांमध्ये ‘डीआरटीबी’चे प्रमाण २८ टक्के होते. २०१३ ते २०१७ मध्ये यात वाढ होऊन ते ३८ टक्क्यांवर आले तर २०१८ ते २०२२ मध्ये यात आणखी वाढ होऊन ४० टक्क्यांवर आले आहे.
- फुफ्फुसाच्या ‘डीआरटीबी’चे प्रमाण ९४ टक्के
फुफ्फुसाचा ‘डीआरटीबी’ होण्याचे प्रमाण ९४ टक्के तर, फुफ्फुसाव्यतिरिक्त इतर अवयवांना होणाऱ्या या रोगाचे प्रमाण ६ टक्के आहे. गंभीर बाब म्हणजे या रोगाचे प्रमाण वाढत आहे. २००७ ते २०१२ मध्ये ०.२० टक्के असलेले हे प्रमाण २०१८ ते २०२२ मध्ये ११ टक्क्यांवर आले आहे. विशेष म्हणजे, एचआयव्हीबाधितांमध्ये ‘डीआरटीबी’चे प्रमाण ६ टक्के आहे.
- तरुण वयात ५८ टक्के
वयोगट : डीआरटीबीचे प्रमाण
१ ते १८ : ५ टक्के
१९ ते ३९ : ५८ टक्के
४० ते ५९ : २६ टक्के
६० व त्यापुढील : ७ टक्के
-डीआरटीबी बरे होण्याचे प्रमाण ५६ टक्के
:२००७ ते २०१७ मध्ये ४७ टक्के रुग्ण बरे
:२०१८ ते २०२२ मध्ये ६८ टक्के रुग्ण बरे
- ‘डीआरटीबी’मुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे
-२००७ ते २०१२ मध्ये २२ टक्के मृत्यू
-२०१८ते २०२२ मध्ये १७ टक्के मृत्यू
-व्यसनी व्यक्तींमधील ‘डीआरटीबी’चे प्रमाण
:२९ टक्के रुग्ण मद्यपी
: ११ टक्के रुग्ण धूम्रपान करणारे
: ८ टक्के रुग्ण मद्यपी व धूम्रपान करणारे.