औषध व्यावसायिकांची विम्याच्या पूर्ततेसाठी फरफट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 11:26 PM2019-06-04T23:26:29+5:302019-06-04T23:30:03+5:30
मध्यभारतातील औषधांची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या गंजीपेठीतील संदेश दवा बाजाराला शुक्रवारी आग लागली. या आगीत अनेक व्यापाऱ्यांच्या करोडो रुपयांच्या औषधांचा साठा खाक झाला. काही व्यापाऱ्यांनी औषधांचा विमा उतरविला होता. पण विमा कंपन्या नुकसान भरपाई देताना शेतकऱ्यांसारखीच व्यापाऱ्यांची सुद्धा थट्टा करीत आहे. व्यापाऱ्यांकडून वेगवेगळे दस्तावेज मागवत असून, त्याची पूर्तता करता करता व्यापारी हतबल झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्यभारतातील औषधांची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या गंजीपेठीतील संदेश दवा बाजाराला शुक्रवारी आग लागली. या आगीत अनेक व्यापाऱ्यांच्या करोडो रुपयांच्या औषधांचा साठा खाक झाला. काही व्यापाऱ्यांनी औषधांचा विमा उतरविला होता. पण विमा कंपन्या नुकसान भरपाई देताना शेतकऱ्यांसारखीच व्यापाऱ्यांची सुद्धा थट्टा करीत आहे. व्यापाऱ्यांकडून वेगवेगळे दस्तावेज मागवत असून, त्याची पूर्तता करता करता व्यापारी हतबल झाले आहे.
संदेश दवा बाजाराला आग लागल्यानंतर औषधांचा तुटवडा भासू लागला आहे. आग लागून चार दिवस झाल्यानंतरही औषधांची दुकाने सुरू झालेली नाही. शासनाच्या विविध यंत्रणेकडून कारवाया सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून सातत्याने तपासण्या सुरू आहे. अग्निशमन विभागाकडून वेगळी कारवाई सुरू आहे. पोलिसांचे पंचनामे सातत्याने सुरू आहे. दुसरीकडे करोडो रुपयांचा औषधांचा साठा खाक झाल्याने व्यापारी वेगळ्या चिंतेत आहे. अशात काही व्यापाऱ्यांनी औषधांचा विमाही उतरविला होता. त्यांना विमा कंपन्यांकडून विम्याची पूर्तता होईल, अशी अपेक्षा होती. घटनेनंतर विमा कंपन्यांचे प्रतिनिधी पाच पाच वेळा चौकशीसाठी घटनास्थळी आले. घटनास्थळाचे निरीक्षण करून गेल्यानंतर २० ते २५ प्रकारचे वेगवेगळे दस्तावेज उपलब्ध करून देण्याची मागणी व्यापाऱ्यांना केली. विशेष म्हणजे काही व्यापाऱ्यांच्या दुकांनाची अक्षरश: राखरांगोळी झाली आहे. त्यांच्याजवळील दस्तावेज सुद्धा यात नष्ट झाले आहे. अशावेळी विमा कंपन्यांकडून मागणी करण्यात येणाऱ्या दस्तावेजाची पूर्तता कशी करणार असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. या आगीत १०० टक्के नुकसान झालेल्यांमध्ये पुनित मेडिकल, विजय मेडिकोज, सिद्धाविनायक मेडिकल, दयाल ट्रेडलिंक, साहू मेडिकल, साईमीरा एजन्सीज नावाने १० ते १२ व्यापारी आहे.
आगीत नुकसान झालेल्या ६० टक्के व्यापाऱ्यांनी विमा उतरविला आहे तर ४० टक्के व्यापाऱ्यांनी विमा काढला नाही. ज्यांनी विमा काढला नाही अशा व्यापाऱ्यांना बिंल्डींगचे बांधकाम केलेल्या बिल्डरने २० टक्के नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे. पण ज्या व्यापाऱ्यांनी प्रामाणिकपणे विमा काढला, त्या व्यापाऱ्यांचा छळ विमा कंपन्या करीत आहे. व्यापारी झालेल्या नुकसानाने हतबल झाल्या असून, शासनाने यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. शासनाने विमा कंपन्यांवर अंकुश ठेवून व्यापाऱ्यांना होणारा त्रास कमी करावा, अशी मागणी व्यापाऱ्यांची आहे.