सोनिया व राहुल गांधी यांची ध्यानसाधना
By admin | Published: April 12, 2016 05:07 AM2016-04-12T05:07:31+5:302016-04-12T05:07:31+5:30
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गाधी यांनी सोमवारी दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी त्यांनी
नागपूर : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गाधी यांनी सोमवारी दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी त्यांनी मध्यवर्ती स्मारकातील तथागत गौतम बुद्धांची प्रतिमा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यानंतर त्यांनी काही ध्यानसाधनाही केली.
सोमवारी दुपारी ४ वाजता सोनिया व राहुल गांधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एकाच गाडीने दीक्षाभूमीला पोहोचले. त्यांच्यासोबत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, कृपाशंकर सिंह, नितीन राऊत होते. प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य डॉ. राजेंद्र गवई, विलास गजघाटे आणि सुधीर फुलझेले यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह सर्वांचे स्वागत करीत त्यांना मध्यवर्ती स्मारकात घेऊन गेले. सोनियाजी व राहुल गांधी यांनी सर्वप्रथम तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेला व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाला पुष्प अर्पण करीत अभिवादन केले. त्यानंतर दोघांनीही खाली बसून १० मिनिटे ध्यानसाधना केली.
यावेळी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई आणि सचिव सदानंद फुलझेले यांनी सोनियाजी व राहुल गांधी यांचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. यानंतर त्यांनी बोधिवृक्षाला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. तसेच ‘व्हिजिट बुक’मध्ये संदेशही लिहिला. ४ वाजून १५ मिनिटांनी त्यांचा ताफा दीक्षाभूमी परिसरातून बाहेर पडला. यावेळी सदस्य विजय चिकाटे, एन. आर. सुटे, आनंद फुलझेले, कैलास वारके आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘हा मै इन्हे पहेचानती हू’
४दीक्षाभूमीवरील भेटीदरम्यान ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे सोनिया गांधी यांना स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांची भेट घालून देताना त्यांचा परिचय देऊ लागले. तेव्हा सोनिया गांधी लगेच ‘हा मै इन्हे पहेचानती हू’ असे म्हणत सुशील कुमार शिंदे यांना सांगितले की, मी पहिल्यांदा दीक्षाभूमीवर आलेली नाही. यापूर्वीसुद्धा दीक्षाभूमीवर येऊन गेली आहे. तेव्हा सदानंद फुलझेले यांच्याशी भेट झाली होती.
चांदीची प्रतिकृती असलेले दीक्षाभूमीचे स्मृतिचिन्ह भेट
४दरम्यान मध्यवर्ती स्मारकात ध्यानसाधना केल्यानंतर सोनियाजी व राहुल गांधी यांना प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई आणि सचिव सदानंद फुलझेले यांनी पुष्पगुच्छ, चांदीची प्रतिकृृती असलेले दीक्षाभूमीचे स्मृतिचिन्ह आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ भेट स्वरूपात देण्यात आला.
सुरक्षा व्यवस्थेचा पत्रकार व सदस्यांनाही फटका
४सोनिया व राहुल गांधी येणार असल्याने दीक्षाभूमी परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. दुपारी ३ वाजेपासूनच मुख्य रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. स्मारक परिसरात केवळ पासधारकांनाच प्रवेश दिला जात होता. या सुरक्षा व्यवस्थेचा फटका पत्रकार आणि स्मारक समितीच्या काही सदस्यांनाही बसला. काही सदस्यांनी याबाबत आपली नाराजीही व्यक्त केली.
राहुल यांनी केले २२ प्रतिज्ञांचे वाचन
४डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेताना आपल्या अनुयायांना २२ प्रतिज्ञाही दिल्या होत्या. त्या २२ प्रतिज्ञांचा एक शिलालेख दीक्षाभूमीवर उभारण्यात आलेला आहे. या शिलालेखावर संपूर्ण २२ प्रतिज्ञा कोरण्यात आल्या आहेत. बोधिवृक्षाजवळ सोनिया गांधी या ‘व्हिजिट बुक’मध्ये संदेश लिहीत असताना राहुल गांधी त्यांच्याजवळच उभे होते. यावेळी २२ प्रतिज्ञांच्या शिलालेखाने राहुल गांधी यांचे लक्ष्य वेधून घेतले. यावेळी त्यांनी शिलालेखावरील एकेक प्रतिज्ञेचे वाचन केले.
दीक्षाभूमीवर येणे ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट
‘दीक्षाभूमीवर येणे ही माझ्यासाठी फार मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे. यानिमित्त मी दीक्षाभूमीला माझी सद्भावना अर्पण करते.
- सोनिया गांधी
(दीक्षाभूमीवरील व्हिजिट बुकमध्ये लिहिलेला संदेश)