नागपूरकरांना तारणार मध्यम प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:28 AM2017-08-29T00:28:16+5:302017-08-29T00:28:43+5:30

तोतलाडोह प्रकल्प अजूनही कोरडा असला तरी नागपूर जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प मात्र भरू लागले आहेत.

Medium project to save Nagpur | नागपूरकरांना तारणार मध्यम प्रकल्प

नागपूरकरांना तारणार मध्यम प्रकल्प

Next
ठळक मुद्देमध्यम प्रकल्प ४३ टक्के भरले : तोतलाडोहमध्ये अल्प पाणीसाठा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तोतलाडोह प्रकल्प अजूनही कोरडा असला तरी नागपूर जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प मात्र भरू लागले आहेत. त्यामुळे भविष्यात पाण्याचे संकट ओढवलेच तर त्याचा सामना करण्यासाठी हे मध्यम प्रकल्प उपयोगाचे ठरतील.
यंदा मान्सून सुरू झाला तेव्हापासून पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. आकडेवारीनुसार पाऊस चांगला झाल्याचे सांगितले जात असले तरी, नागपुरातील मोठी धरणे अजूनही कोरडी आहेत. त्यामुळे भविष्यात पाणीबाणीची स्थिती निर्माण होते की काय? अशी भीती वर्तविली जात होती. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसाने मध्यम प्रकल्प भरू लागली आहेत. मोठ्या प्रकल्पांपैकी तोतलाडोह सोडले तर उर्वरित तीन प्रकल्पही बºयापैकी भरू लागली आहेत.
नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प आहेत. त्यात आजच्या तारखेला एकूण २८ टक्के इतकाच पाणीसाठा आहे. यापैकी नागपूर जिल्ह्यात पाच मोठे प्रकल्प येतात. यामध्ये तोतलाडोह हे सर्वात मोठे धरण असून, त्याची एकूण पाणीसाठा क्षमता १०१६.९ दलघमी इतकी आहे. त्यात आजघडीला केवळ ११४ दलघमी म्हणजे ११ टक्के इतकाच पाणीसाठा आहे तसेच रामटेक (खिंडसी) या प्रकल्पात २२ टक्के इतका पाणीसाठा आहे. परंतु कामठी खैरी या प्रकल्पात ५३ टक्के, लोअर नांद वणा ८८ टक्के, वडगाव ८४ टक्के इतका पाणीसाठा आहे.
याशिवाय नागपूर जिल्ह्यात एकूण १३ मध्यम प्रकल्प आहेत. याची एकूण पाणीसाठा क्षमता २००.६ दलघमी इतकी आहे. आजघडीला ही धरणे ८६.०७ दलघमी म्हणजे ४३ टक्के इतकी भरली आहेत. यामध्ये पांढराबोडी हे १०० टक्के भरले आहे. त्यानंतर कान्होलीबारा ५८ टक्के, खेकरानाला ५२ टक्के, वेणा ४९ टक्के, सायकी ४४ टक्के, उमरी ४० टक्के, कार ३४ टक्के, कोलार ३० टक्के, मोरधाम ३२ टक्के, चंद्रभागा ३१ टक्के इतके भरले आहे. धरणांमधील साठा वाढत असला तरी उपलब्ध पाणीसाठासुद्धा पुरेसा म्हणता येणार नाही. परंतु आणखी काही दिवस सलग पाऊस होईल आणि धरणे भरतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तर आवश्यक उपाययोजना केली जाईल
सध्या पाऊस कमी असला तरी नागपुरातील पिकांसाठी योग्य पाऊस झालेला आहे. धानाचीही ६५ टक्के रोवणी झालेली आहे. ३५ टक्के रोवणी व्हायची आहे. काही दिवसांपासून पाऊस चांगला होत आहे. त्यामुळे धानासाठीसुद्धा समाधानकारक पाऊस राहील, असा विश्वास आहे. राहिला प्रश्न पिण्याच्या पाण्याचा तर पाऊस होईल आणि पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होणार नाही, अशी अपेक्षा आहे. मात्र तशी वेळ आलीच तर जिल्हा प्रशासन आवश्यक उपाययोजना करेल, पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होऊ दिले जाणार नाही.
- सचिन कुर्वे , जिल्हाधिकारी

Web Title: Medium project to save Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.