आरक्षणासाठी पंतप्रधानांना भेटणार
By admin | Published: May 16, 2017 02:12 AM2017-05-16T02:12:38+5:302017-05-16T02:12:38+5:30
धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी संपूर्ण पुराव्यासह शिवसेनेच्या २१ खासदार व मंत्र्यांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लवकरच भेट घेणार असे ....
शिवसेना पक्षप्रमुखांनी स्वीकारले धनगर समाजाचे निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी संपूर्ण पुराव्यासह शिवसेनेच्या २१ खासदार व मंत्र्यांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लवकरच भेट घेणार असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र धनगर समाज आरक्षण समन्वय समितीच्या शिष्टमंडळाला दिले.
खासदार कृपाल तुमाने यांच्या नेतृत्वात समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी समितीच्या शिष्टमंडळात नागपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम डाखोळे, धनगर युवक मंडळाचे अध्यक्ष रमेश पाटील, ज्ञानेश्वर घायवट, नारायण खरवडे, प्रा. राजू गोरडे, प्रा. अमित ठमके, नामदेव खाटके, नवनाथ ढगे, पिपराजी महाका, सूर्यकांत गोखणे, दिनकर नागे, बजरंग गडदे, शिरीष उगे, हेमराज डाखोळे आदी पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता. या बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणावर चर्चा करण्यात आली.
रमेश पाटील यांनी भेटीविषयी माहिती देताना सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिष्टमंडळाला आश्वासक शब्द दिला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाने भाजपा व शिवसेनेला मदत केली. भाजपाने शब्द फिरविला असला तरी सेनेला त्याची जाणीव असल्याचे ते म्हणाले. भाजपाप्रमाणे शिवसेना धनगर समाजाच्या नेत्यांना मंत्रिपद किंवा मंडळे देऊ शकत नाही. मात्र समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा कळीचा आहे.
त्यासाठी शिवसेनेच्या सर्व खासदार व मंत्र्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून विचारणा करणार असे आश्वासन शिवसेना पक्ष प्रमुखांनी दिल्याची माहिती रमेश पाटील यांनी दिली.