पटोलेंच्या विरोधात वडेट्टीवारांच्या घरी बैठक; चंद्रपूर जिल्हाध्यक्षांवर केलेल्या कारवाईवरून रोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2023 09:27 PM2023-05-09T21:27:08+5:302023-05-09T21:27:47+5:30
Nagpur News भाजप विरोधात लढण्यासाठी एकीकडे तीन पक्षांची वज्रमूठ बांधण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे काँग्रेस नेत्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे.
नागपूर : भाजप विरोधात लढण्यासाठी एकीकडे तीन पक्षांची वज्रमूठ बांधण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे काँग्रेस नेत्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपशी हात मिळवणी केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रपूरच्या काँग्रेस जिल्हाध्यक्षांवर कारवाई केली होती. यावरून पटोलेंच्या विरोधात माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नागपुरातील घरी मंगळवारी बैठक झाली. तीत माजी मंत्री सुनील केदारही उपस्थित होते. २२ जिल्ह्यात अनैसर्गिक युती झाली, मग एकट्या चंद्रपुरात कारवाई का, असा सवाल करीत पटोले यांच्या भूमिकेवर आक्षेप घेण्यात आला.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माजी मंत्री वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक असलेले चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्यावर कारवाई केल्यामुळे चंद्रपुरात गटबाजी उफाळून आली आहे. मंगळवारी या प्रकरणामुळे पटोले यांच्यावर रोष असलेल्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी वडेट्टीवार यांच्या नागपुरातील बंगल्यावर आ. सुनील केदार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. चंद्रपूरमध्ये १२ पैकी ७ बाजार समितीत काँग्रेसचा विजय झाला. त्यानंतरही प्रदेशाध्यक्षांनी आकसापोटी कारवाई केली, असा आरोप बैठकीत करण्यात आला.
पटोलेंविरोधात दिल्लीवारी
प्रकाश देवतळे यांच्यावरील कारवाईचे प्रकरण आता दिल्ली दरबारी नेण्याची तयारी पटोले विरोधकांनी चालविली आहे. देवतळे हे चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह दिल्लीत जाणार असून, हायकमांडकडे दाद मागणार आहेत.
सहकार क्षेत्रात विचारपूर्वक कारवाई करावी : वडेट्टीवार
बाजार समितीच्या निवडणुका या पक्षाच्या चिन्हाशिवाय होतात. आपसात ताळमेळ करून ही निवडणूक लढली जाते. राज्यात अनेक ठिकाणी अभद्र युती झाल्या आहेत. कारवाई करावी लागल्यास सर्वांवर कारवाई करावी लागेल. त्यामुळे सहकार क्षेत्रात कारवाई करत असता विचार करून केली पाहिजे, असा सल्ला विजय वडेट्टीवार यांनी प्रदेशाध्यक्ष पटोले यांना दिला.