वाट्टेल तेव्हा लिंक टाकून मिटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:07 AM2020-12-09T04:07:05+5:302020-12-09T04:07:05+5:30
नागपूर : शाळा बंद असल्या तरी शिक्षण विभागाच्या बैठकांमुळे शिक्षक बेजार झाले आहेत. केंद्रप्रमुखापासून उपसंचालकापर्यंत वाटेल त्याला ऑनलाईन बैठका ...
नागपूर : शाळा बंद असल्या तरी शिक्षण विभागाच्या बैठकांमुळे शिक्षक बेजार झाले आहेत. केंद्रप्रमुखापासून उपसंचालकापर्यंत वाटेल त्याला ऑनलाईन बैठका घेऊन शिक्षकांचा मनस्ताप वाढवीत आहे. शाळा बंद आहे, विद्यार्थी घरात आहे. पण ऑनलाईन स्वाध्याय, करिअर गायडन्स ॲप यासंदर्भात त्याच त्या बैठका होत असल्याच्या तक्रारी शिक्षकांच्या आहेत. बैठकांचा वेळही निश्चित नाही, अधिकाऱ्यांना वाटेल तेव्हा लिंक टाकून बैठकांचे आयोजन करण्यात येत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.
या सर्वात मोठी गोची मुख्याध्यापकांची होत आहे. संस्था मुख्याध्यापकांना वेगळे नाचवते, शिक्षण विभागाकडून वेगळे आदेश देण्यात येतात. शिक्षकांनी दिलेले काम न केल्यास मुख्याध्यापकांना टार्गेट केले जाते. मीटिंग कुणी घ्याव्यात, याचेही नियोजन नाही, केंद्रप्रमुखापासून उपसंचालक कार्यालयापर्यंत ज्या वाटेल, तो बैठकी घेत असल्याची ओरड शिक्षक करीत आहेत. सध्या शिक्षकांना डायटवाल्यांनी ऑनलाईन स्वाध्याय आणि करिअर गायडन्स अॅपवरून ग्रामीण भागातील शाळांना चांगलेच बेजार केले आहे. स्वाध्याय व्हॉट्सअॅप ग्रुप विद्यार्थ्यांनी जॉईन करावा, यासाठी तगादा लावला जात आहे. शनिवारी बैठक घेतात आणि सोमवारी विद्यार्थ्यांची आकडेवारी मागतात, त्यामुळे शिक्षक, मुख्याध्यापक वैतागले आहेत. डायटच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेतल्यानंतर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख हे सुद्धा याच विषयावर बैठकी घेत आहेत. वरून काही माहिती मागितली की, पंचायत समितीस्तरावरील अधिकारी शिक्षकांच्या मागे तगादा लावून सोडत आहेत.
विशेष म्हणजे कुणी झूमवर बैठका घेत आहे. काही वेबेक्स डाऊनलोड करायला लावत आहे. काही बैठका गुगल अॅपवर घेतल्या जात आहेत. हे सर्व अॅप शिक्षकांनी डाऊनलोड केले आहे. विशेष म्हणजे अनेक शाळांनी ऑनलाईन वर्ग सुरू केले आहे. त्यांचे टामटेबल आखण्यात आले आहे. याचवेळी अधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र असल्याने, शिक्षकांचे ऑनलाईन वर्गाकडे दुर्लक्ष होत आहे.
- ग्रामीण भागातील शाळांना ऑनलाईनचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खेड्यापाड्यात नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईलसुद्धा नाही. अशात शिक्षकांना युजर्स वाढवा, विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करा, १०० टक्के रजिस्ट्रेशन झालेच पाहिजे, यासाठी अधिकाऱ्यांकडून प्रेशर टाकले जात आहे. एकीकडे शाळा सुरू होण्याची बोंबाबोंब आहे तर दुसरीकडे अधिकारी अनावश्यक कामात शिक्षकांना गुंतवीत आहेत.
मिलिंद वानखेडे, मुख्याध्यापक